सातारा : सातारा तालुक्यातील साबळेवाडी येथे लग्नाच्या वरातीत नाचण्यास नकार दिल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एका तरुणास लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी घडली. या प्रकरणी तब्बल दोन महिन्यांनंतर दि. २७ जानेवारी रोजी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बबन पांडुरंग भिलारे (वय ३०, रा. मानेवाडी वेळे कामथी) हे लग्नाच्या वरातीत उपस्थित होते. त्यावेळी अजित हनुमंत माने हा दारूच्या नशेत फिर्यादीस नाचण्यासाठी शर्ट पकडून मागून ओढू लागला. मात्र, लग्नाची वेळ झाली असल्याचे सांगत नाचण्यास नकार दिल्याने अजित माने यास राग आला. यानंतर अजित माने याने फिर्यादीस बाहेर नेऊन लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. काही वेळाने त्याने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण केली. याचवेळी आबासाहेब आगाजी माने व चंद्रकांत आगाजी माने यांनी फिर्यादीचा डावा हात पिरगळून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार कुंभार करत आहेत.