सातारा : चित्रकारांनी आपला कला अभ्यास सतत असाच चालू ठेवून भविष्यात न थांबता सातत्याने चित्रकलेची शास्त्रशुद्ध माहिती गोळा करून चित्र निर्मिती करावी व ती समाजापर्यंत पोहोचवावी, यातून सामाजिक स्तरावरती चित्रकलेचे महत्त्व वाढेल, अशी अपेक्षा संस्कृती कला अकादमीचे प्रमुख प्रसाद चव्हाण यांनी व्यक्त केली.
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने स्मिता कोरपे, एकांक नलवडे आणि शिल्पा चिटणीस या चित्रकारांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन संस्कृती कला अकादमीचे प्रमुख प्रसाद चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे पत्रकार हणमंत पाटील यांनी सर्व चित्रकारांचे अभिनंदन केले. चित्रकला ही प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे व वरचेवर असे उपक्रम शहरांमध्ये राबवले गेले पाहिजेत ज्यातून समाजाला चित्रकलेचा आस्वाद घेता येईल, असे सांगितले.
चित्र प्रदर्शनाचे आयोजक शिरीष चिटणीस यांनी सभागृह हे चित्रप्रदर्शनासाठी सर्वांसाठी मोफत उपलब्ध असून, वरचेवर इथे अशा पद्धतीची प्रदर्शने पुढे येऊन भरवावीत व त्या चित्रांची विक्री देखील कशी होईल यासंदर्भात संबंधित चित्रकारांनी प्रयत्न करावेत, असे मत व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते संस्कृती कला अकादमीच्या विद्यार्थ्यांचा विविध स्तरावरील स्पर्धा प्रदर्शन व परीक्षामध्ये यश मिळवल्याबद्दल कलाविद्यार्थी हर्ष जिमन, सानिका फडतरे, सिद्धी जगताप, वैभवी मुळे, राधिका नारकर, समिहन पवार, रुद्राणि कुलकर्णी, केदार कदम, स्वरांजली धनवडे, कृष्णाली गुजर यांचा सन्मान करण्यात आला.
प्रदर्शन हे दि. 18 पर्यंत सर्वांसाठी खुले असून, यातील स्मिता कोरपे यांची भारतीय चित्रशैलीतील विविध चित्रे तसेच एकांक नलवडे यांची व्यक्तिचित्रणातील कलाकृती आणि शिल्पा चिटणीस यांची निसर्ग चित्रे पाहता येणार आहेत. सिद्धी जगताप हिने सूत्रसंचालन केले. सहभागी चित्रकारांनी मनोगते व्यक्त केली.