फलटण : सासकल, तालुका फलटण येथे ग्रामपंचायत सासकल च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळेस असकल गावच्या सरपंच उषा राजेंद्र फुले यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.
यावेळी सासकल जन आंदोलन समितीचे सोमीनाथ घोरपडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत महापुरुषांना एका जातीमध्ये बंदिस्त न करण्याविषयी मांडणी केली. या देशाच्या जडणघडणीमध्ये व आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे असणारे अतुल्य योगदान यावर भाष्य करताना त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. कामगारांच्या विषयी व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य, रिझर्व बँकेच्या स्थापनेमध्ये असणारे त्यांचे योगदान, शेतीसह नद्याजोड प्रकल्पावर त्यांनी केलेलं काम, राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये त्यांचे असणारे योगदान व त्यातील सामान्य माणसाच्या न्यायी हक्कांचे केलेले रक्षण यावर त्यांनी आपल्या मनोगतात प्रकाश टाकला. नवनिर्वाचित ग्रामसेवक अशोक महादेव सापते यांनी आतापर्यंतच्या सर्वच ग्रामसेवकांमध्ये पहिल्यांदा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याचा पट उलगडून त्यांच्या विचार कार्याविषयी मांडणी केली. त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या संपूर्ण जीवन कार्यावर त्यांनी विचार व्यक्त केले.
यावेळी सासकल गावचे माजी उपसरपंच राजेंद्र धोंडीबा घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य हणमंत गंगाराम मुळीक, सामाजिक कार्यकर्ते मंगेश मदने, सुरेश मुळीक,सोमीनाथ घोरपडे, प्रकाश गोरे, राजेंद्र बाबुराव फुले, ग्रामपंचायत कर्मचारी किसन अण्णा पवार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांच्या विचार कार्याला अभिवादन केले.
सासकल येथील बुद्ध विहारांमध्ये ज्येष्ठ नागरिक माणिकराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व तरुण-तरुणींनी बुद्ध वंदना करून महामानवाला अभिवादन केले. दोन्ही ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात आला.