कराड : राज्यातील महिलांना शेती क्षेत्रात हक्काची कायदेशीर ओळख मिळवून देण्यासाठी शासनाने लागू केलेल्या ‘महाराष्ट्र महिलाशेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६’ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. एकूण ३५८ तालुक्यांपैकी एकट्या कराड तालुक्यातून तब्बल २६ हजार ७८२ महिलांची नोंद ‘शेतकरी महिला’ म्हणून कृषी विभागाकडे झाली आहे.
या महिलांना शेतकरी म्हणून लवकरच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कराड तालुक्याच्या या ऐतिहासिक ‘सक्षमीकरण मॉडेल’चे सध्या सर्वच स्तरातून कौतुक होत असून, यामुळे राज्यातील इतर तालुक्यांमध्येही महिला शेतकरी नोंदणी मोहिमेला मोठी गती मिळत आहे.
या कायद्याची अंमलबजावणी करण्यात कराड तालुक्याने घेतलेली भरारी ही राज्यासाठी दिशादर्शक ठरली आहे. कृषी विभाग, स्थानिक प्रशासन आणि महिला बचत गटांच्या प्रभावी समन्वयामुळे व गावागावांत राबवलेल्या विशेष मोहिमांमुळे कराडमधील हजारो महिलांना त्यांचे शेतकरी प्रमाणपत्र मिळवणे शक्य झाले आहे. या प्रमाणपत्रामुळे महिलांना बँक कर्ज, कृषी योजना, शासकीय सबसिडी, अनुदानांमध्ये थेट प्राधान्य मिळणार आहे.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे - आधार कार्ड (मोबाइल क्रमांकाशी लिंक असलेले), मतदार ओळखपत्र, ७/१२ आणि ८-अ उतारा (जमिनीची मालकी असल्यास), जमीन नसलेल्यांसाठी : प्रत्यक्ष शेती करत असल्याचे स्वयंघोषणापत्र, पासपोर्ट साइज फोटो
कराड तालुक्यात ३५ कृषी सहाय्यकांच्या मार्फत २२२ गावात शेतकरी महिलांची नोंदणीची मोहीम राबवली. हे करत असताना संबंधित गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी सखी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कामकाज पाहिले.
- प्रशांत शेंडे, तालुका कृषी अधिकारी, कराड
कृषी विभागाकडून शेतकरी महिला म्हणून आमची नोंदणी करण्यात आली आहे. याचा आम्हाला खूप आनंद होत असून आता आम्हाला कृषी विभागाच्या विविध योजनांचा घेता येणार आहे.
- वैशाली विकास थोरात, महिला शेतकरी, कार्वे, ता. कराड
‘महिला शेतकरी’ नोंदणीत कराडचा राज्यात डंका; कराडची भरारी राज्यासाठी दिशादर्शक, २६ हजार ७८२ महिलांची नोंद
by Team Satara Today | published on : 06 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा