कोरेगाव : कोरेगाव शहरातील ऊस वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या गंभीर वाहतूक कोंडीबाबत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा मनसेच्या स्टाईलमध्ये तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोरेगाव तालुकाध्यक्ष सागर संभाजी बर्गे यांनी दिला.
सोमवारी प्रांताधिकारी प्रमोद कुदळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी व पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना निवेदन सादर करण्यात आले. सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्ग, खंडाळा-शिरोळ राज्य मार्ग तसेच जिहे कठापूर ते खेड-नांदगिरी हा जिल्हा मार्ग या तिन्ही प्रमुख रस्त्यांचे क्रॉसिंग कोरेगाव शहरातून होत असल्याने येथे सतत वाहतूक कोंडी निर्माण होते. दिवसरात्र साखर कारखान्यांची ऊस वाहतूक सुरू असल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शाळकरी मुले, रुग्णवाहिका आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कोरेगाव पोलीस ठाण्यातील शहर वाहतूक नियंत्रण शाखेत पूर्वी सहा कर्मचारी कार्यरत होते, परंतु सध्या केवळ चारच पोलिस कर्मचारी नेमण्यात आले असून सुट्ट्या, रात्रगस्त आणि इतर कारणांमुळे प्रत्यक्षात फक्त दोनच कर्मचारी महामार्गावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी अधिकच तीव्र झाली आहे.
याशिवाय विविध साखर कारखाने, नागरी सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, पतसंस्था, तसेच खाजगी फायनान्स कंपन्यांनी महामार्गालगत पार्किंगसाठी रस्त्यांवर कब्जा केला आहे. या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीचा गोंधळ अधिक वाढला असून, नागरिकांचा त्रास असह्य झाला आहे. सोमवार आणि गुरुवार या दिवशी आठवडा बाजार भरत असल्याने परिस्थिती आणखीनच गंभीर होते. त्यामुळे या दोन दिवसात ऊस वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे.