सातारा : श्रमिक जनता विकास संस्था, ता. जावलीचे अध्यक्ष आदिनाथ ओंबळे यांच्या पुढाकारातून मेणवली, ता. वाई येथे कातकरी समाजातील ३४ लाभार्थ्यांना शहरालगत मेणवली येथे प्रत्येकी अर्धा गुंठा या प्रमाणे एकूण १७ गुंठे जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांच्या स्थिर निवाऱ्याचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ही जमीन खरेदी शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय जमीन खरेदी अर्थसहाय योजना अंतर्गत करण्यात आली असून, प्रत्येक लाभार्थ्यास रुपये १ लाख प्रमाणे ३४ लाख इतके अनुदान देण्यात येणार आहे. भूमिहीन कातकरी बांधवांना हक्काची जागा मिळवून देण्याचा शासनाचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम प्रत्यक्षात उतरला आहे.
या उपक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विश्वास सिद (प्रकल्प संचालक, डीआरडीए, जिल्हा परिषद सातारा), योगेश खरमाटे (उपविभागीय अधिकारी, वाई), श्रीमती सोनाली मेटकरी (तहसीलदार, वाई), श्री नारायण घोलप (गटविकास अधिकारी, पंचायत समिती वाई) आणि श्री वैभव पवार (नायब तहसीलदार, वाई) शाम राठोड (विस्तार अधिकारी पं स वाई)यांचे सहकार्य लाभले.
कातकरी समाजाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा
याशिवाय मेणवली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. लक्ष्मी वेदपाठक, उपसरपंच श्री संजय चौधरी, ग्रामपंचायत अधिकारी श्रीम.सुचित्रा राऊत, मंडल अधिकारी श्री इंगवले, तलाठी श्री काकडे तसेच श्री कांताराम जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जमीन खरेदी व शासकीय प्रक्रिया सुरळीत पार पडली. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, कातकरी समाजाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.