मराठी भाषा मातृवत प्रेमाचा अखंड झरा : यशेंद्र क्षीरसागर; औंध येथील भवानी बाल विद्यामंदिरामध्ये बालकांशी संवाद

by Team Satara Today | published on : 27 April 2026


औंध : "मराठी भाषा ही आईप्रमाणे आहे. ती माया लावते आणि संस्कारांच्या रूपाने खूप काही देते. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेविषयी लळा जोपासावा आणि अभ्यास करून भाषेच्या क्षेत्रात समृद्ध व्हावे,"असे प्रतिपादन खटाव पंचायत समितीच्या अंगणवाडी विभागाचे सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.

येथील भवानी बाल विद्या मंदिरामध्ये बालकांशी विविध विषयांवर दिलखुलास संवाद साधताना ते बोलत होते. बालकांनी देखील त्यांच्याशी मनमोकळ्या ज्ञान समृद्ध करणाऱ्या गप्पा मारल्या.

" प्रत्येक भाषेला विशिष्ट दर्जा आहे. तथापि कोणत्याही नागरिकाच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात मातृभाषेला सर्वोच्च स्थान असावे .कारण मातृभाषेतूनच सर्वश्रेष्ठ अभिव्यक्ती होते .मुलांनी आपल्या भावना व्यक्त करताना मराठी भाषेतून अधिक प्रभावीपणे प्रकट होतात हे ओळखले असेल. कोणत्याही भाषेचा तीटकारा बाळगण्याची गरज नाही. तथापि आपल्या मराठी भाषेचा गोडवा समजून घ्यावा.

मुलांनी सोप्या भाषेतली मराठीची पुस्तके आवडीने वाचावीत. पु. ल. देशपांडे ,नारायण सुर्वे, कुसुमाग्रज, शांता शेळके, जी ए.कुलकर्णी बा.सी. मर्ढेकर,केशवसुत असे अनेक महान लेखक कवी मराठी भाषेने आपल्याला दिले .अनेक उत्तम वक्ते दिले. कीर्तनकार, निरूपणकार दिले. अनेक कला या आपल्याला आपल्या भाषेमुळे जवळच्या वाटतात. अमृताबरोबर लावलेली पैज आपली मराठी भाषा जिंकते असे सार्थ अभिमानाने ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. हे सर्व लक्षात घेता बालकांनी मराठी भाषेचा अभ्यास आवडीने करावा. शिक्षक, पालक आणि समाजातील इतर घटक यांनी बालकांमध्ये मराठी भाषेची गोडी वाढवावी."शाळेतील स्वच्छता , शिस्त आणि नीटनेटकेपणा याचे श्री क्षीरसागर यांनी कौतुक केले.

मुख्याध्यापक श्री. यादव यांनी श्री. क्षीरसागर यांच्या आभार मानले. यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लेखकांनी स्वातंत्र्याचे भान जोपासावे - किशोर बेडकिहाळ; संबोधी प्रतिष्ठानचा बोरगावकर स्मृती साहित्य पुरस्कार सोहळा उत्साहात
पुढील बातमी
जिल्ह्यातील २५०० दुकाने बंद; खत-बियाणे विक्रेत्यांचा संप पेटला; खरिपाच्या तयारीला फटका

संबंधित बातम्या