सातारा : सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाने केवळ काही दिवसांत चोरीच्या गुन्ह्यातील 7 तोळ्यांचे सोन्याचे दागिने हस्तगत करत आरोपीस अटक करण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे हा आरोपी फिर्यादीचा नातेवाईकच असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.
अक्षय विलासराव मोरे वय 28 रा. बेबलेवाडी ता. सातारा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहेे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. हेमा विलास मोरे, रा. बेबलेवाडी, ता. सातारा यांनी 31 ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती की, त्यांच्या घरातून 7 तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत. या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. या गुन्ह्याचा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांनी डी.बी. पथकाला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. दरम्यान, पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे वाढे, ता. सातारा येथून एका आरोपीस ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशीत आरोपीने कबुली दिली की, तो फिर्यादीचा नातेवाईक असून त्यानेच घरातून सोने चोरले. या तपासानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील 7 तोळ्यांचे सर्व दागिने हस्तगत केले.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विनोद नेवसे, पोहवा मनोज गायकवाड, पंकज ढाणे, विद्या कुंभार, राजु शिखरे, शिवाजी वायदंडे, दादा स्वामी, प्रदीप मोहिते, पोकॉ संदिप पांडव, होमगार्ड वरद गायकवाड यांनी सहभाग घेतला. या यशस्वी कारवाईबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय अधिकारी राजीव नवले व प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांनी सर्व अधिकारी व कर्मचार्यांचे कौतुक केले आहे.