सातारा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक शिवजयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त शिवज्योत आणण्यासाठी विविध गडकिल्यांवरुन आणलेल्या शिवज्योतीसह मावळे धावले. आयोजित कार्यक्रमांमधून शिवगर्जनेचा जयघोष घुमला. तर शहरासह ग्रामीण भागातही विविध विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मराठा स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक जयंती उत्सव अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येतो. यावर्षीदेखील जिल्ह्यात विविध उपक्रमांनी पारंपरिक शिवजयंती साजरी करण्यात आली.
शिवजयंती उत्सावानिमित्त विविध किल्ल्यांवरुन शिवज्योती आणण्यात आल्या. मंगळवारी पहाटेपासूनच शिवप्रेमी शिवज्योतीसह धावत होते. जिल्ह्यातील किल्ले अजिंक्यतारा, प्रतापगड, रायरेश्वर, चंदन वंदनगड, वैराट आदि गडकिल्ल्यांवरुन शिवज्योत आणण्यात आल्या.
शिवज्योतींचे गावोगावी स्वागत करण्यात आले. यावेळी शिवगर्जनेचा जयघोष करण्यात आला. शिवमावळ्यांनी शिवज्योत दौडीचे आयोजन केले होते. काही ठिकाणी विधायक उपक्रम राबवण्यात आले.
शिवप्रेमींचे श्रमदान
ऐतिहासिक ठेवा म्हणून गडकिल्ल्यांकडे पाहिले जाते. मराठी साम्राज्याच्या शौर्यगाथांचे साक्षीदार असलेले कित्येक गडकिल्ले संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा गडकिल्ल्यांच्या स्वच्छता व संवर्धनासाठी शिवप्रेमी पुढाकार घेत आहेत. शिवजयंतीचे औचित्य साधून शिवप्रेमींनी काही गडकिल्ल्यांवर श्रमदानातून स्वच्छता मोहिम राबवली. तर काही मावळे मागील काही महिन्यांपासून आठवड्यातून एक दिवस गडांवर श्रमदान करुन जुन्या टाक्यांमधील गाळ काढणे, पायरी मार्गांची डागडुजी, जुन्या वास्तु व पायवाटांचे दगड रचत आहेत.