पेटीएम मशीन तपासणीच्या बहाण्याने 8.25 लाखांची फसवणूक; एकाला अटक, मेढा पोलिसांची कारवाई

by Team Satara Today | published on : 07 August 2026


सातारा : पेटीएम मशीन तपासणीच्या बहाण्याने व्यापार्‍याचा विश्वास संपादन करून त्याच्या पेटीएम खात्यावरून ऑनलाइन कर्ज काढत तब्बल 8 लाख 25 हजार 640 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मेढा पोलिसांनी एका संशयितास अटक केली आहे. या प्रकरणामुळे जावली तालुक्यातील व्यापारी व व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदा नारायण भोसले (वय 50, रा. मेढा, ता. जावली) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. संशयित धनवंत बाळकृष्ण सल्लक (रा. केळघर, ता. जावली) याला पोलिसांनी अटक केली आहे.

फिर्यादीनुसार, 15 मार्च रोजी संशयित हा मेढा येथील आयडीबीआय बँकेसमोरील गणेश स्वामी समर्थ झेरॉक्स सेंटर या दुकानात पेटीएम मशीन तपासणीसाठी आल्याचे सांगून गेला. त्याने विश्वास संपादन करत फिर्यादीच्या पेटीएम खात्यावरून ऑनलाइन कर्ज काढले. त्यानंतर कर्ज परतफेडीच्या नावाखाली पेटीएम कंपनीचा असल्याचे सांगितलेल्या मोबाईल क्रमांकावर रक्कम वळवून एकूण 8 लाख 25 हजार 640 रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंगटे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सोयाबीन विक्रीचे पैसे न देणार्‍या कंपनीविरोधात गुन्हा ; फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांनी तातडीने पुढे येण्याचे तळबीड पोलिसांचे आवाहन
पुढील बातमी
सायबर सेलच्या कारवाईने फसवणुकीतील शंभर टक्के रक्कम काही तासांत खात्यात जमा; उंब्रज पोलिसांची कामगिरी

संबंधित बातम्या