वाई : भिरडाचीवाडी (ता. वाई) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षिकेकडून विद्यार्थ्यांना गैरवागणूक मिळत आहे. त्याच्या निषेधार्थ आज ग्रामस्थांनी गेटला टाळे ठोकले. ग्रामस्थांनी वाई पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शिक्षिकेच्या बदलीची मागणी केली. जोपर्यंत बदली होत नाही, तोपर्यंत शाळेचे टाळे काढणार नसल्याची आक्रमक भूमिका घेतली.
निवेदनात म्हटले आहे, की भिरडाचीवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेवर चार शिक्षकांची नेमणूक असून, त्यापैकी एक शिक्षिका गेल्या चार वर्षांपासून तिसरीच्या वर्गावर नेमणुकीस आहे. शिक्षिकेच्या बाबतीत विद्यार्थ्यांकडून येत असलेल्या तक्रारींवरून पालक व शाळा व्यवस्थापन समितीने चार वर्षांत अनेकवेळा तक्रारी अर्ज केले आहेत, तसेच ग्रामस्थांनी गेल्या चार वर्षांत बदलीसाठीही अनेक अर्ज केले आहेत.
गेल्या वर्षी नऊ महिने त्यांची बदली चिंधवली (ता. वाई) येथे करण्यात आली होती. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून पुन्हा भिरडाचीवाडी येथे बदली करण्यात आली आहे. त्या विद्यार्थी आणि पालकांशी उद्धट वर्तन करत आहेत.
याबाबत संबंधितांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्या शिक्षिकेची बदली करण्याची मागणी केली; परंतु प्रशासनाकडून दखल न घेतल्याने महिला व ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी यांनी भिरडाचीवाडी शाळेला भेट दिली.
ग्रामस्थांशी चर्चा केली; परंतु संतप्त ग्रामस्थ शिक्षिकेच्या बदलीबाबत आग्रही असून, जोपर्यंत टाळे काढणार नाही. संबंधित शिक्षिकेची दोन दिवसांत बदली न झाल्यास येत्या रविवारी (ता. २६) वाई पंचायतीसमोर सर्व महिला, ग्रामस्थ उपोषण करणार असल्याचा इशारा सरपंच विजय वेळे, सदस्य रमेश दगडे, सोसायटीचे उपाध्यक्ष नारायण धुरगुडे यांनी दिला.