पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; सातारा जिल्ह्यातील बळीराजाला मोठा आर्थिक आधार

- हेमंतकुमार चव्हाण, माहिती अधिकारी, सातारा

by Team Satara Today | published on : 10 August 2026


शेती क्षेत्रात सातत्याने वाढणारा उत्पादन खर्च, हवामानातील अनिश्चितता आणि बाजारातील शेतमालाच्या भावातील चढ-उतार यामुळे शेतकऱ्यांना वारंवार आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत कर्जाचा वाढता भार हा बहुतांश शेतकऱ्यांसाठी एक मोठे आव्हान ठरतो. या बिकट परिस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि आधार देणारी ठरत आहे. कर्जमुक्तीचा थेट लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि भविष्यातील शेतीबाबत त्यांच्यात निर्माण झालेला नवचैतन्यमय आत्मविश्वास हीच या योजनेची खरी फलश्रुती मानली जात आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात सातारा जिल्ह्यातील तब्बल 19  हजार 58  कर्ज खात्यांना मिळाला असून, एकूण 142 कोटी 7 लाख 39  हजार 284  रुपयांची रक्कम थेट संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात आली आहे.

कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील आर्थिक ताण कमी होण्यास मोठी मदत झाली आहे. कर्जाच्या परतफेडीची निरंतर चिंता दूर झाल्याने शेतकऱ्यांना पुढील हंगामाचे नियोजन अधिक आत्मविश्वासाने आणि मोकळेपणाने करता येत आहे. नवीन पीक घेणे, दर्जेदार बियाणे व खते वापरणे, शेतीमध्ये आवश्यक ती गुंतवणूक करणे आणि कुटुंबाच्या दैनंदिन गरजांकडे व्यवस्थित लक्ष देणे यासाठी आर्थिक मोकळीक निर्माण होणे हा या कर्जमुक्तीचा सर्वांत मोठा फायदा ठरत आहे.

कर्जमुक्ती म्हणजे केवळ कर्जाची रक्कम कमी होणे किंवा कागदावरील आकडे मिटणे नव्हे, तर शेतकऱ्याच्या मनावरील आर्थिक दडपण पूर्णपणे दूर होऊन त्याला पुन्हा स्वाभिमानाने उभारी मिळणे होय. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसाठी ही योजना एका नव्या आणि समृद्ध सुरुवातीची संधी ठरत आहे.

दरम्यान, जिल्ह्यात एकूण एकतीस हजारांपेक्षा जास्त कर्ज खात्यांपैकी पंचवीस हजारांहून अधिक खात्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून हे काम ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त पार पडले आहे. योजनेचा लाभ थेट आणि पारदर्शकपणे मिळण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याने, जिल्ह्यात एकूण 31 हजार 445  कर्ज खात्यांपैकी  25 हजार  569 खात्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून, 81.50  टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

थोडक्यात सांगायचे तर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही केवळ एक सरकारी योजना नसून, संकटात सापडलेल्या बळीराजाला पुन्हा नव्याने उभे करणारी संजीवनी ठरली आहे. सातारा जिल्ह्यातील हजारो शेतकरी कुटुंबांचे जीवन यामुळे चिंतामुक्त झाले असून, शेती व्यवसायाला एक नवी दिशा आणि उर्मी मिळाली आहे. या कर्जमुक्तीमुळे बळीराजाच्या आयुष्यात समृद्धीचे, स्थैर्याचे आणि आत्मसन्मानाचे नवीन पर्व सुरू झाले आहे, हे निश्चित.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पोवई नाक्यावरील बाळासाहेब देसाई स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करा - पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला विविध विकास कामांचा आढावा
पुढील बातमी
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने साताऱ्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा १६ऑगस्ट रोजी गौरव; अध्यक्ष रमेश इंजे व संघटक दिनकर झिंब्रे यांची माहिती

संबंधित बातम्या