सातारा : ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्यावर पर्यटनवृद्धीच्या दृष्टीने शिवसृष्टी साकारली जाणार आहे. त्याकरिता पर्यटन जिल्हा नियोजन समिती तसेच विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या कामाला कुठेही निधी कमी पडणार नाही. तसेच शाहू नगरीचे भाग्यविधाते छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा नगरपालिकेच्या प्रशस्त इमारतीत बसवण्याचा मानस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
सातार्यात शिवजयंतीच्या निमित्ताने शिवसाहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे, त्याची माहिती देण्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते यावेळी शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीचे विनोद कुलकर्णी, अमित कुलकर्णी, विनय सहस्रबुद्धे, अमोल मोहिते, राजू गोरे, अक्षय गवळी, रविंद्र माने, हर्षल चिकणे आदी यावेळी उपस्थित होते.
ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवराय अथवा तत्सम महापुरुषांच्या संदर्भात सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी वादग्रस्त वक्तव्य केली जातात. नंतर या विधानांच्या संदर्भात घुमजाव केले जाते. राहुल सोलापूरकर यांनी जे वक्तव्य केले ते निंदनीय स्वरूपाचे आहे. त्याची बाजू यापूर्वी तुम्ही स्पष्ट केली आहे. जो प्रस्तावित कायदा केंद्र सरकार लागू करेल तो होईलच. पण त्यापूर्वी सध्या प्रचलित कायद्याद्वारे वादग्रस्त वक्तव्य करणार्यांना कठोर शासन केले जावे, यासंदर्भात राज्य सरकार योग्य ती पावले उचलेल यात शंका नाही, असे ते म्हणाले. पोवई नाका शिवतीर्थ येथील सुशोभिकरणाचे सुरू आहे. येथील सुशोभीकरणाचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. नाक्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा 25 फूट उंच बसवला जाणार आहे. याकरता स्वतः नगरपालिकेने दोन कोटी रुपयांची तरतूद ठेवली आहे. दिल्ली येथील नामवंत शिल्पकारांच्या माध्यमातून या पुतळ्याचे काम केले जाणार आहे. मालवण येथील शिव पुतळ्याचे अनावरण लवकरच होत आहे. तेथील काम संपल्यानंतर शिवतीर्थ परिसरातील छत्रपती शिवराय पुतळ्याचे काम होईल. या संदर्भात पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना संबधित शिल्पतज्ञांशी संपर्क करावयास सांगितल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले.
अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्याच्या संदर्भात त्यांना विचारले असता शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, किल्ल्यावरील राजसदर ऐतिहासिक स्वरूपात पुनर्जीवित केली जाईल. तसेच काही मंदिरे जुन्या इमारती यांना इतिहासतज्ञांच्या सल्ल्याने पुन्हा उभारले जाईल. नागरिकांसाठी येथे पदपथ व पुरेशा लाईटची व्यवस्था आणि अन्य सुविधा येथे उपलब्ध केल्या जातील. प्रतापगड सुशोभीकरणाच्या कामातही हलगर्जीपणा झाल्याच्या तक्रारीत संदर्भात विचारले असता ते म्हणाले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी यासंदर्भात बैठक घेतली आहे. या विषयासंदर्भात माझ्यापर्यंत तक्रारी आल्या आहेत. आयोजित बैठकीला मी उपलब्ध नव्हतो. तरीपण येथील काम दर्जेदार व्हावे असा आमचा सुद्धा आग्रह आहे.
पावसाळ्यात ठोसेघर, कास रस्त्यांवरील दरडी कोसळतात. त्यामुळे त्याबाजूकडील गावांचा सातार्याशी संपर्क तुटतो. त्यावर दरडींसाठी काही उपाययोजना करता येतील काय, यासंदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ठोसेघर, कास घाटातील प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल. मात्र, तेथे कोणतीही उपाययोजना करताना तेथील नैसर्गिक संपदेला हानी पोहोचणार नाही, याकडे आम्ही लक्ष देणार आहोत.