सातारा : जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर साताऱ्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, शिवसेनेने आता जिल्ह्यात आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपच्या राजकीय खेळीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कंबर कसली असून, येत्या २० एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साताऱ्यात शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेने थेट भाजपच्या बालेकिल्ल्यात घुसून 'करेक्ट कार्यक्रम' करण्याचे नियोजन केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करत १५ जागांवर विजय मिळवून दमदार कामगिरी केली होती. या युतीकडे स्पष्ट बहुमत असतानाही, भाजपने अनपेक्षित राजकीय फिल्डिंग लावत शिवसेनेच्या गोटात मोठा सुरुंग लावला. कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या गटातील दोन सदस्य फोडून भाजपने थेट आमदार शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना अध्यक्षपदी बसवले, तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक राजू भोसले यांना उपाध्यक्षपद मिळवून दिले. या गनिमी काव्यामुळे सत्तेच्या उंबरठ्यावर असलेल्या शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. हा राजकीय पराभव जिव्हारी लागल्याने आता पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला 'जशास तसे' उत्तर देण्याची रणनीती आखली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याची सुरुवात कोरेगाव मतदारसंघातील अंगापूर या तीर्थक्षेत्राच्या भेटीने होणार आहे. या गावाला दोन कोटींचा निधी देऊन पालकमंत्र्यांनी आमदार महेश शिंदे यांच्या मतदारसंघात एका नव्या पर्यायाचे संकेत दिले आहेत. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीनंतर शिंदे आणि देसाई यांच्यातील वाढते अंतर या कृतीतून अधिक स्पष्ट झाले आहे. कोरेगावातील कार्यक्रमानंतर सातारा शहराच्या मध्यवर्ती असलेल्या गांधी मैदानावर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. ही सभा प्रामुख्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रभावाला शह देण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नवनिर्वाचित १५ सदस्यांचा विशेष सत्कार करणार असून, याद्वारे जिल्हा परिषदेतील ‘नैतिक विजय’ साजरा केला जाणार आहे. विशेषतः पाटण मतदारसंघात भाजपने पालकमंत्र्यांना दिलेले आव्हान आणि जिल्हा परिषदेत शिवसेनेचे सदस्य फोडल्याचा राग या दौऱ्याच्या निमित्ताने व्यक्त होण्याची शक्यता आहे. सातारा-जावळी या भाजपच्या बालेकिल्ल्यात आता शिवसेनेने थेट शड्डू ठोकल्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.