हायवे जाम करून रील बनवणार्‍या पाच युवकांवर गुन्हा

सातारा शहर डीबी, वाहतूक नियंत्रण विभाग आणि भुईंज महामार्ग पोलिसांची कारवाई

by Team Satara Today | published on : 13 July 2025


सातारा : तीन दिवसांपूर्वी कोल्हापूर-पुणे महामार्गावर गाड्या अडवून स्वतःची रील काढणार्‍या पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पाचही जणांवर सातारा शहर डीबी पथक, सातारा वाहतूक नियंत्रण विभाग तसेच महामार्ग पोलिसांनी कारवाई केली आहे.

ओम प्रवीण जाधव राहणार तारळे तालुका पाटण जिल्हा सातारा सध्या राहणार जुना आरटीओ चौक सातारा, कुशल सुभाष कदम राहणार जरंडेश्वर नाका सदर बाजार सातारा, सोहम महेश शिंदे राहणार शिंगणापूर तालुका माण जिल्हा सातारा, निखिल दामोदर महांगडे राहणार परखंदी तालुका वाई जिल्हा सातारा आणि एक विधी संघर्षित बालक अशी कारवाई करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.

याबाबत सातारा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.10 जुलै रोजी ओम प्रविण जाधव (तारळे ता. पाटण) या युवकाने सातारा येथे नवीन वाहन खरेदी केले होते. त्या वाहनाचे ड्रोनच्या सहाय्याने चित्रिकरण करण्यासाठी त्याने कुशल सुभाष कदम रा. सदरबझार जरंडेश्वर नाका सातारा याला थार गाडी घेवून बोलवले. त्यानंतर सोहम शिंदे आणि निखील जाधव व एक अल्पवयीन याने ड्रोनचे टेंडर घेतले आहे. त्यानुसार सर्व साथीदारांना वाहनांसह बोलावून घेवून ती वाहने सातारा-बेंगलोर हायवेवरील कोल्हापूर ते पुणे जाणार्‍या लेनवर वाहनांना अडवून ठेवली. तसेच आपल्या सोबतची वाहने हायवेवर वाहतुकीस अडथळा होईल, अशी थांबवून ड्रोनच्या मदतीने त्याचे चित्रीकरण केले. यानंतर इन्स्टाग्रामवर त्याची रील बनवून व्हायरल केली होती. त्याबाबत पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेवून संबंधीत युवकांवर इन्स्टाग्रामवरून माहिती प्राप्त करून गुन्हा नोंद केला होता.

याबाबत वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर डी.बी. पथक, सातारा वाहतूक नियंत्रण विभाग, भुईज येथील महामार्ग पोलीस यांनी सदर रिल्सवरून संबंधितीत वाहन चालक, ड्रोन वापरणारे यांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेवून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. तसेच त्यांच्या अन्य साथीदारांची माहिती घेवून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. श्रीमती वैशाली कडुकर, सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शामराव काळे, वाहतूक शाखेचे अभिजीत यादव, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो.हवा. सुजीत भोसले, सुहास पवार, रमेश शिखरे, निलेश जाधव, विक्रम माने, पो.ना. पंकज मोहिते, पो.कॉ. सुशांत कदम, तुषार भोसले, सचिन रिटे, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल घुमाळ, मच्छद्रिंनाथ माने, सुहास कदम यांनी केली आहे.

याबाबत सातारा जिल्हा पोलीस दलाकडून आवाहन करण्यात आले आहे की, नवीन वाहन खरेदी, लग्न समारंभ, वाढदिवस अशा विविध कार्यक्रमामध्ये काही युवक हे जाणीवपूर्वक सामान्य लोकांना वाहतुकीस व रहदारीस अडथळा होईल, अशा प्रकारे वाहनांचा वापर करून त्याचे चित्रिकरण करीत आहेत. व ते इन्स्टाग्राम व इतर सोशल मिडीयावर व्हायरल करीत आहेत, त्यांची माहिती घेवून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जमिअत उलमा ए हिंदने दिला मानवतेचा संदेश : प्रा. डॉ. यशवंतराव पाटणे
पुढील बातमी
अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा

संबंधित बातम्या