सातारा : सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डी वर सातत्याने वाढते अपघात चिंताजनक बाब बनली आहे. या रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यावर लवकरच सुयोग्य तोडगा काढला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सातारा- लोणंद रस्त्याच्या संधर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली. याप्रसंगी ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. बैठकीला आ. महेश शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी कदम यांच्यासह मदन साबळे, किरण साबळे पाटील, राहुल शिंदे, राजेंद्र नलावडे, साईराज कदम, जितेंद्र कदम, अभिजीत साबळे पाटील, धीरज नलावडे, विनय कदम, महेंद्र कदम यांच्यासह खेड, वाढे, पाठखळ, आरळे, वडूथ, आरफळ, शिवथर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा तालुक्यातील वाढे, वडूथ, आरळे, शिवथर आदी गावांमधून जाणारा हा महामार्ग दाट लोकवस्तीमधून जात असून या मार्गावर अनेक धोकादायक वळणे आहेत. वारंवार अपघाताने अनेकांना जीव गमावला लागला असल्याचे गंभीर मुद्दे स्थानिकांनी बैठकीत उपस्थित केले. यावर मंत्री महोदयांनी अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता या मार्गावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. स्थानिकांच्या सूचनांची दखल घेऊन योग्य उपाययोजना केल्या जातील असे सांगितले. गावांमधून जाणारे रस्ते बायपास करणे, रस्त्यांची सुधारणा, धोकादायक वळणांवर सुरक्षा उपाययोजना, सूचना फलक, रस्त्याचे रुंदीकरण तसेच वाहतूक नियंत्रणासाठी ठोस नियोजन आणि उपाय तातडीने राबविण्याचे स्पष्ट निर्देश ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्गावरील विविध पुलांची प्रलंबित कामे, रस्त्यांची सद्यस्थिती तसेच भविष्यातील विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.