मुनावळे जलपर्यटन पर्यटकांसाठी खुले; साहसी खेळांचा थरार अनुभवता येणार, देशातील गोड्या पाण्यातील पहिले केंद्र

by Team Satara Today | published on : 30 September 2026


बामणोली : पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून उदयास येत असलेले मुनावळे जलपर्यटन केंद्र रविवार (दि. २७) पासून पुन्हा पर्यटकांसाठी खुले झाले आहे. नैसर्गिक आपत्ती आणि सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले हे पर्यटन केंद्र सुरू झाल्याने राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांना कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावर विविध साहसी जलक्रीडांचा थरार अनुभवता येणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मुनावळे जलपर्यटन प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. देशातील गोड्या पाण्यातील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलपर्यटन केंद्र म्हणून या प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. अत्याधुनिक सुविधा, साहसी खेळ आणि पर्यावरणपूरक पर्यटनाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मुनावळे येथे पर्यटकांना स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, पॅरासेलिंग, बम्पर राईड, हॉट एअर बलून, लेक क्रूझिंग बोट, फ्लाईंग फिश, फ्लायबोर्डिंग आदी साहसी जलक्रीडांचा अनुभव घेता येणार आहे. दरम्यान, या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
राज्य वन्यजीव मंडळाची मंजुरी
मुनावळे जलपर्यटन केंद्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्राच्या सीमेपासून एक किलोमीटरच्या आत बफर क्षेत्रात येते. त्यामुळे या संवेदनशील परिसरात प्रकल्पातील बांधकामांच्या कामांना विविध पर्यावरण व वन्यजीवविषयक मंजुरी आवश्यक होती. मात्र राज्य वन्यजीव मंडळासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर संबंधित विभागांची मंजुरी मिळाल्याने प्रकल्पाच्या पुढील कामांना गती मिळणार आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरीही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.
अल्ट्रा लक्झरी हाऊसबोटची भर
मुनावळे येथील जलपर्यटन केंद्रावर अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक बोटींचा वापर करण्यात येत आहे. आगामी काळात आणखी बोटी दाखल होणार आहेत. त्यामध्ये अल्ट्रा लक्झरी हाऊसबोट, सोलर इलेक्ट्रिक क्रूझिंग बोट, लेक क्रूझिंग बोट, कॅराव्हल सेल बोट, मल्टीहुल क्रूझिंग एफआरपी बोट यासह विविध बोटींचा समावेश आहे.
मुनावळे येथे पहिल्या टप्प्यात विविध पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. वन विभागाच्या मंजुरीनंतर या कामांना आता गती मिळण्याची चिन्हे आहेत. यामध्ये पर्यटन विभागाचे क्षेत्रीय कार्यालय, प्रेक्षागृह (गॅलरी), उपाहारगृह, तिकीट आरक्षण कक्ष, सुरक्षा चौकी, पर्यटक निवास व्यवस्था, बोटिंग क्लब आणि बोट धक्का यासह विविध कामे केली जाणार आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात आढळले दुर्मिळ लांब मानेचे, मऊ पाठीचे कासव, रेस्क्यू स्क्वॉडकडून सुरक्षित रेस्क्यू, वनविभागाच्या निगराणीखाली उपचार सुरु
पुढील बातमी
राज्यात कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्यात; प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येच्या घटनेनंतर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

संबंधित बातम्या