दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणासह इतर परीक्षांमधील गैरव्यहारांबद्दलचा मुद्दा दिल्लीत गाजत आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी संसदेबाहेर आंदोलन सुरू असतानाच लोकसभा आणि राज्यसभेतही या मुद्द्याचे पडसाद उमटले. लोकसभेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यसभेतही विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनी भूमिका मांडली. विरोधक आक्रमक झाल्याने दोन वाजेपर्यंत तीन वेळा कामकाज तहकूब करावे लागले.
जंतर-मंतर मैदानावर सीजेपीचे आंदोलन सुरू असून, जंतर-मंतर ते संसद असा मोर्चा काढण्या आला होता. मात्र, मोर्चापूर्वीच लाठीहल्ला करण्यात आला. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. याचे पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत लोकसभेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी खासदार लोकसभा अध्यक्षांच्या समोरील जागेत जमा झाले. घोषणाबाजी कायम राहिल्याने लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत चार वेळा तहकूब करण्यात आले.
राज्यसभेत खरगे यांची सरकार टीका
वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेतही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांवरील लाठीहल्ल्याचे पडसाद उमटले. विरोधकांनी यावरुन सरकार विरोधात घोषणा दिल्या.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, "मला पेपरफुटी आणि नीट परीक्षेतील घोटाळ्याबद्दल बोलण्याची संधी दिली. हा विषय विद्यार्थ्यांशी जोडलेला आहे. मी कोट्यवधी मुलांच्या भविष्याबद्दल बोलत आहे. हा विषय घेऊन विद्यार्थी जंतर-मंतरवर जमा झाले आहेत. त्यांच्यावर लाठीहल्ला करण्यात आला. सरकारत ताकदीचा वापर करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना तिथून हटवण्याचा प्रयत्न करत आहे", अशी टीका मल्लिकार्जून खरगे यांनी केली.
विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले. सभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर राज्यसभा सभापतींनी कामकाज तहकूब केले. त्यानंतर सलग तीन वेळा राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.