डोंगराला लावलेल्या वणव्‍यात दोन आराम बस जळून खाक

by Team Satara Today | published on : 15 March 2025


कास :  जावळी तालुक्यात वणवे लावण्याचे सत्र सातत्याने सुरू असून, काल  दुपारी मेढा- मोहाट पुलाजवळील मोहाट व पिंपरी गावच्या हद्दीतील डोंगराला लावलेल्या वणव्‍याने परिसरात उभ्या असलेल्या दोन आराम बस अक्षरश: जळून खाक झाल्‍या. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले.

याबाबत अधिक माहिती अशी, की मेढा ते मोहाट पुलाजवळ मोहाट गावच्या हद्दीत बिगरशेती केलेली प्‍लॉटिंगची जमीन आहे. या ठिकाणी काही लोकांनी घरे सुद्धा बांधलेली आहेत. याच ठिकाणी मोकळ्या जागेत दोन मोठ्या आरामबस उभ्या होत्‍या. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने लावलेल्या वणव्‍याने या परिसरात मोठ्या प्रमाणात आग भडकली. त्यात सायंकाळी हवेचा जोर असल्याने आग वेगाने पसरत या बस उभ्या असलेल्या परिसरात आली. हा हा म्हणता या दोन्ही बसनी पेट घेतला. बस पेटताच त्‍यातून मोठाले आवाज होत होते. जवळपास कोणी नसल्याने आग पसरत गेली. 

त्यात मेढा परिसरात आग विझवणारे बंब नसल्याने व या बस नेमक्या कोणाच्या आहेत हे माहीत नसल्याने आग विझविण्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. परिणामी संपूर्ण बसचा अक्षरशः कोळसा झाला. या परिसरात असलेली घरेही वणव्याने वेढली होती. या घरांमध्‍ये रहायला कोणी नसल्याने हा परिसर दुर्लक्षित आहे; परंतु सुदैवाने कोणत्या घराला आग न लागल्याने मोठे नुकसान होण्याचे टळले. 

वणव्यांचे लोण आता अगदी माणसाच्या घरापर्यंत आले, तरी यातून वणवा लावणारे किंवा प्रतिबंध करण्यासाठी असलेला वनविभाग कोणीही धडा घ्यायला तयार नसून वनविभागाच्या सुस्त कारभाराने जावळीतील अनमोल वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत वणवा लावणाऱ्यांविरुद्ध एकही कारवाई न झाल्याने वणवा लावणारे सुसाट असून, मानवी व वनसंपत्तीचे होणारे नुकसान भरून न येणारे आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सरकारी कामात अडथळा प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार
पुढील बातमी
महाराष्ट्रात दुधाचे दर वाढले

संबंधित बातम्या