बांधकाम विभागाने प्रत्येक कामाचा दर्जा आणि वेळेचे बंधन पाळावे - ना. शिवेंद्रसिंहराजे; नागपूर दौर्‍यात विविध विकासकामांचा घेतला आढावा

by Team Satara Today | published on : 27 August 2026


सातारा : नागपूर जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध विकासकामे सुरु आहेत. प्रत्येक काम जनहिताचे आहे, याचे भान ठेवून विभागाने कामाच्या दर्जाबाबत कसलीही तडजोड करू नये तसेच काम वेळेतच पूर्ण झाले पाहिजे याचे बंधन पाळावे, अशा सक्त सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या. 

ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी नागपूर जिल्हा दौर्‍यावेळी विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) मुलांचे व मुलींचे वसतिगृह, विभागीय कार्यालय आणि ग्रंथालय इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. 

विदर्भातील शासकीय संस्थेसाठी प्रथमच ॠ+16 उंच इमारतीच्या माध्यमातून आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. विद्यार्थ्यांसाठी सुमारे 508 विद्यार्थ्यांची निवासक्षमता, आधुनिक ग्रंथालय, ई-लायब्ररी, प्रशिक्षण केंद्र आणि प्रशासकीय सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. या कामाची पाहणी करून त्यांनी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना केल्या. 

ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी नागपूर स्पोर्ट्स हब प्रकल्पाची पाहणी करून कामाची प्रगती, प्रस्तावित क्रीडा सुविधा आणि प्रकल्पाच्या पुढील नियोजनाचा आढावा घेतला. तसेच सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नागपूर अंतर्गत विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी मुख्य अभियंता  संभाजी माने आणि सार्वजनिक बांधकाम मंडळ, नागपूरच्या अधीक्षक अभियंता श्रीमती निता ठाकरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

विभागातील रिक्त पदांची सद्यःस्थिती, जिल्हानिहाय पूल व रस्त्यांची माहिती, वृक्षलागवड टप्पा-2, इमारतींचे परिरक्षण व दुरुस्ती, जनसुविधा केंद्रांसाठी प्रस्तावित जागा, नाबार्ड-31 अंतर्गत कामांची प्रगती, हायब्रिड ऍन्युइटी योजनेंतर्गत सुरू असलेली कामे, खड्डे भरण्याची सद्यःस्थिती तसेच अमृतकाल रस्ते विकास योजना’ आराखड्याचा आढावा घेऊन विकासकामे वेळेत, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावीत, तसेच कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये, अशा स्पष्ट सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. नागपूर विभागातील पायाभूत सुविधांची कामे अधिक गतिमान आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाजप नगरसेविकांची एकजूट; नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना राखी बांधून दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
पुढील बातमी
सातारा पालिकेच्या सभेत गॅस पाईपलाईनवरून खंदारेंचा थेट हल्लाबोल, 25 कोटींच्या नुकसानभरपाईचे सात कोटींचे गणित कसे?

संबंधित बातम्या