पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर पुणे महानगरपालिका आणि पीएमपीएमएल प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना लागू करण्यास सुरुवात केली आहे .महिलांच्या सुरक्षिततेसाठी काही दिवसांपूर्वीच पालिकेकडून बसस्थानकांवर सुरक्षारक्षक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता पीएमपीएमएलने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
नवीन आदेशानुसार, सार्वजनिक बसमध्ये महिला प्रवाशांना त्रास दिल्यास, बस चालक आणि वाहकांनी तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात बस घेऊन जाऊन तक्रार नोंदवावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतुकीत महिलांसाठी अधिक सुरक्षित वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पीएमपी प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर बस स्थानकांवर विशेष सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आली असून, महिलांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या नव्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये अधिक सक्षम CCTV कॅमेरे, महिला प्रवाशांसाठी विशेष सुरक्षा रक्षक, तसेच रात्रीच्या वेळी महिलांसाठी खास बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतुकीत महिलांना अधिक सुरक्षित आणि संरक्षित वातावरण मिळावे, असा पीएमपी प्रशासनाचा प्रयत्न आहे.
सार्वजनिक वाहतुकीमध्ये महिलांसाठी आरक्षित जागांवर टवाळखोर पुरुष प्रवासी बसण्याच्या तक्रारी वारंवार समोर येतात. महिलांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाचा अधिकार मिळावा यासाठी पुणे महापालिका परिवहन मंडळ (पीएमपी) प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमांनुसार, महिलांसाठी आरक्षित जागांवर पुरुष प्रवासी बसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. यामुळे महिलांसाठी सुरक्षित प्रवास सुनिश्चित होणार असून, अशा प्रकारच्या वादविवादांवर नियंत्रण मिळवता येईल. पीएमपी प्रशासनाचा हा निर्णय सार्वजनिक वाहतुकीतील महिला सुरक्षेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यास मदत होईल.
पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेसंबंधी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्या मागील दोन वर्षांच्या हालचालींचा सखोल तपास करत त्याचा तांत्रिक रेकॉर्ड मिळवला आहे. या तपासात गाडे केवळ स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनच नव्हे, तर शिरूर, अहिल्यानगर आणि सोलापूर बसस्थानक परिसरातही मुक्तपणे वावरत असल्याचे आढळले आहे.