मंगल कार्यालयातील विवाहसोहळ्यातील चोरी उघड; कोल्हापूरचा सराईत चोरटा जेरबंद, दागिने व रोख रक्कम फिर्यादीकडे सुपूर्द

by Team Satara Today | published on : 20 July 2026


सातारा : शहरातील एका मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यादरम्यान सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी प्रकरणाचा सातारा शहर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत यशस्वी तपास करत आरोपीला अटक केली. या कारवाईत चोरीस गेलेले सुमारे साडेचार लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करून ती फिर्यादीकडे सुपूर्द करण्यात आली.

कोरेगाव रस्त्यावरील मंगल कार्यालयात विवाह समारंभ सुरू असताना हळदीच्या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांची लगबग सुरू होती. याच संधीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने वधूपक्षासाठी राखीव असलेल्या खोलीत प्रवेश करून पर्समधील तीन तोळे सोन्याचे दागिने आणि 36 हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती. या घटनेनंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास सुरू करताना पोलिसांनी घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीचा आधार घेत संशयिताचा माग काढला. तपासाची सूत्रे कोल्हापूर जिल्ह्याकडे वळल्यानंतर पोलिसांनी बाळासो ऊर्फ अजित प्रकाश पाटील (वय 27, रा. पुंगाव, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीतील सर्व सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.

या कारवाईमुळे चोरीतील शंभर टक्के मुद्देमाल परत मिळविण्यात पोलिसांना यश आले. तपासासाठी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी विशेष पथकाला सूचना दिल्या होत्या.

पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथक, सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी संयुक्तपणे ही कारवाई यशस्वी करून गुन्ह्याचा छडा लावला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवथर येथे कंटेनरमधून तब्बल 1.98 कोटींच्या बनावट गोवा दारूचा साठा जप्त; सातारा तालुका पोलिसांची कारवाई; एक अटकेत, दुसरा संशयित फरार
पुढील बातमी
दुय्यम निबंधकावर झालेल्या हल्ल्याचे सातार्‍यात पडसाद; नोंदणी व्यवहार ठप्प, महसूल संकलनावरही परिणाम

संबंधित बातम्या