सातारा : छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेची काळजी घेणारा राजा होता. शिस्तप्रिय, गुणवंताचे कौतुक करणा-या राजाचे चरित्र युवा पिढीने अभ्यासणे आवश्यक आहे. प्रा. रमणलाल शहा यांनी ९० व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट ग्रंथ रुपाने आणल्याने युवा वर्गास वाचनातून स्फूर्ती, प्रेरणा मिळेल असे मत माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.
प्राचार्य रमणलाल शहा यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील 'छत्रपती शिवाजी महाराज एक युगप्रवर्तक सेनानी' या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ जिल्हा बँकेच्या सभागृहात पुस्तक प्रकाशनानंतर श्रीनिवास पाटील बोलत होते. शनिवारी (ता. १७) ९१ व्या वर्षात पदार्पण करीत असून, यानिमित्ताने या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, शिवसेनेचे उपनेते (ठाकरे गट) नितीन बानुगडे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रयतचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के, सहसचिव पी. .एन.पवार ,डॉ. शिवलिंग मेनकुदळे, यांचेसह सातारा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. चेतना माजगावकर, प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, शिरीष चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या मनोगत बोलताना रमणलाल शहा सर म्हणाले की, छत्रपती शिवरायांचे चरित्र नव्या पिढीला समजावे त्यांची जिद्द आत्मविश्वास धैर्य आणि लढा वृत्ती नव्या पिढीला समजण्यासाठीच हे लेखन मी केले आहे. आपण सर्वांनी आजपर्यंत दिलेल्या प्रेमामुळेच मी ही तेरा पुस्तके लिहू शकलो राज घराण्याचा पाठिंबा मला लाभला तसेच अनेकांचे प्रेम यातूनच हे ग्रंथ निर्मितीचे काम मी पूर्ण करू शकलो .
यावेळी बोलताना श्रीनिवास पाटील म्हणाले की महाराजांवरचा पहिला पोवाडा महात्मा फुले यांनी लिहिला शिवाजी महाराजांचे संपूर्ण चरित्र रयत शिक्षण संस्थेसारख्या शिक्षण संस्थेने आता पुढे आणून त्याचा प्रचार व प्रसार नव्या पिढीसाठी केल्यास खऱ्या अर्थाने नव्या पिढीला त्याचे दान मिळेल आणि त्यातून ज्ञान मिळेल. रमणलाल शहा सरांची या ग्रंथ निर्मितीची जिद्द, इच्छा, आकांक्षा आणि नव्या पिढी पुढे घालून दिलेला आदर्श हा खरोखरच कौतुकास्पद आहे.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यातच प्राचार्य रमणलाल शहा मित्र परिवाराच्या वतीने प्राचार्य रमणलाल शहा सरांचा विशेष मानपत्र व शिवरायांची प्रतिमा देऊन मित्र परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी देण्यात आलेल्या मानपत्राचे लेखन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले होते. या मानपत्राचे वाचन दीपक खांडके यांनी केले.
या कार्यक्रमात बोलताना माजी आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले की, प्राचार्य शहा सरांनी एकूण 13 पुस्तकाचे लेखन केले. राज घराण्याचा वारसा जपण्याचा व ते वृद्धिंगत करण्याचं लेखनातून काम हे विस्तृत शिवचरित्र लिहून शहा सरांनी केले आहे. प्रारंभी खटाव तालुक्यात शिक्षण चळवळ यानंतर ज्योतिष चळवळ, विद्यापीठाची निर्मिती व लेखनात दिलेले योगदान हे विशेष आदर्श आणि कौतुकास्पद असे आहे. वयाची ९१ व्या वर्षात त्यांच्यातील जिद्द आणि उर्मी ही खरोखरच इतरांना स्फूर्ती देणारी आहे.
यावेळी बोलताना शिवचरित्र व्याख्याते नितीन बानुगडे पाटील म्हणाले की, शिवरायांचा घडलेला इतिहास नव्या पिढी पुढे आणण्याचे आद्य आणि महत्त्वाचे काम शहा सरांनी केले आहे. या ग्रंथ निर्मितीमध्ये इतिहास खऱ्या अर्थाने अनुभवता येत आहे. शिवरायांच्या चरित्रातील असा कुठलाच प्रांत, शास्त्र, विषय नाही की ज्याचा अभ्यास या शिवचरित्रात आपला पाहायला मिळेल व छत्रपती शिवरायांनी हे खरोखरच दाखवून दिले होते. शिवचरित्र हे माणसे घडवण्याचे चालते, बोलते विद्यापीठ आहे. छपाईची कला छत्रपतींनी सुरत होऊन यंत्र आणत पहिला सुरत येथे पारेख परिवाराकडून छापखाना स्थापन केला गेला. आणि त्याचे नावही श्री शिवाजी छापखाना असेच होते. शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी जे काम केले तेच काम उद्याच्या पिढीसाठी शहा सर करीत आहेत.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सातारा-जावली तालुक्याचे आमदार श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, शहा सरांचे आणि आमच्या राजघराण्याचे तब्बल तीन पिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. सर्वच परिवाराशी आपुलकीचे नाते आदराचे नाते सरांनी जोडले. आज छत्रपतींच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे लोटली. शिवरायांचा अपेक्षित इतिहासच आजपर्यंत इतिहासकारांनी मांडला नाही. मात्र संशोधनातून शहा सरांनी या ग्रंथ निर्मितीचे जे काम केले ते खरोखरच वाखाणण्यासारखे आहे. छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाबण्याचे आणि वेगळ्या पद्धतीने मांडण्याचे कामच आतापर्यंत झाले. ज्यातून विवाद निर्माण होतील ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. शिवजयंतीच्या तारखेबाबतचा वादही असाच एक उदाहरण म्हणून येथे पाहता येईल. हे ग्रंथ निर्मितीचे कार्य खरोखरच शहा सरांकडून झाले हा एक विशेष गौरवाचा असा हा सन्मान सोहळा आज रक्षाबंधना दिवशी संपन्न होत आहे याचे कौतुक वाटते. या कार्यक्रमात या ग्रंथाच्या मुखपृष्ठाचे सुंदर चित्र रेखाटणाऱ्या सुनील पाटील यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित शेख यांनी केले तर सर्व मान्यवरांचे स्वागत नितीन शहा यांनी केले. या सोहळ्यासाठी माजी खासदार श्रीनिवास पाटील यांचे समावेश माजी आयुक्त चंद्रकांत दळवी. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मसापचे शिरीषचिटणीस शिवलिंग मेनकुदळे, रयतचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के, सहसचिव पी.एन.पवार यांचे सह प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी सातारा ज्योतिष मंडळाचे विद्यमान पदाधिकारी डॉ. संदीप श्रोत्री, हेमंत बर्गे, युवराज पवार यांचे सह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी शहा परिवाराच्या वतीने नितीन शहा, सौ.केतन शहा, हर्ष शहा, रोहित शहा, सौ. नेहा शहा-दावडा व सौ.अंकिता शहा यांचे सह चंद्रकांत चिंचकर आदी मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले.