धनुष्यबाण चिन्ह गोठवणार?, दोन्ही सेनेच्या भांडणाचा फायदा...; वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

by Team Satara Today | published on : 20 August 2026


अकोला - शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी सुरू आहे. गेल्या ७ दिवसांपासून या सुनावणीत उद्धव ठाकरेंकडून कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद मांडला. या युक्तिवादावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. दोन्ही शिवसेनेतील या भांडणाचा फायदा भाजपाला होताना दिसत आहे असं सांगत त्यांनी कदाचित चिन्ह गोठवले जाऊ शकते असा दावा केला आहे. अकोला येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

प्रकाश आंबेडकरांनी या सुनावणीवर म्हटलं की, सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सेनेत भांडण सुरू आहे. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावरून या खटल्याचा निकाल दिसतो. अगोदर दक्षता न घेतल्याने निवडणूक आयोगाने शिंदेंना दिलेले चिन्ह आणि त्यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले होते. परंतु आताची परिस्थिती पाहिली याचा फायदा कोणाला तर तो भाजपाला होताना दिसत आहे. शिवसेनेचे चिन्ह गोठवले जाईल असं दिसते. चिन्ह गोठवल्यास दोन्ही सेनेला एकमेकांविरोधात लढावे लागण्याची परिस्थिती आहे. चिन्ह नसल्याने या दोघांकडे असणारे आमदार, खासदार टिकतील का सगळ्यात मोठा प्रश्न आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच या भांडणाचा फायदा भाजपाला आहे. जर कोर्टाने चिन्ह गोठवले तर या दोन्ही पक्षातील आमदार, खासदार भाजपाकडे पळाल्याशिवाय राहणार नाहीत अशी परिस्थिती आहे. निर्णय कुणाच्याही बाजूने लागो पण फायदा भाजपाचा आहे. मध्यंतरी फोडाफोडीचे जे सत्र त्यांनी सुरू केले होते, पण जंतर मंतरवरील आंदोलनानंतर या प्रकाराला आळा बसला होता. आता पुन्हा चिन्ह गोठवल्याचा निर्णय झाल्यानंतर आमदार, खासदारांची पळापळ होण्याची दाट शक्यता दिसते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळण्याची स्थिती दिसून येते असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. 

सुप्रीम कोर्टात ठाकरेंची मागणी काय?

आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकांवर अंतिम युक्तिवाद मांडताना सुप्रीम कोर्टात ठाकरेंच्या वकिलांनी चिन्ह गोठवावे अशी मागणी केली. जर हे चिन्ह आम्हाला मिळणार नसेल तर ते गोठवावे असं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात म्हटलं. तर आज जे पक्षांतराचा लाभ घेत आहेत, ते म्हणजे पक्षचिन्हाचा. विधिमंडळ बहुमताच्या आधारे हे पक्षचिन्ह त्यांना देण्यात आले. त्यामुळे त्यांनी पक्षांतर केले की नाही याचा एकदा तो कायमचा निर्णय घ्यावा. जर त्यांनी पक्षत्याग केला असेल तर ज्या मुख्य आधारावर निवडणूक आयोगाने त्यांना पक्षचिन्ह दिले तो आधारच नष्ट होईल अशी मागणी देवदत्त कामत यांनी युक्तिवादाच्या शेवटी कोर्टात केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
‘२८ तारखेपर्यंत ठोस निर्णय घ्या, नाहीतर...’ मराठा आरक्षणावरून आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

संबंधित बातम्या