मल्हारपेठ : लग्नघटिका समीप येताच मंगल कार्यालयात पै-पाहुण्यांची वर्दळ वाढली... सर्वत्र मंगलमय वातावरण होते. मंगलाष्टिका झाल्या, अक्षता टाकल्या अन् वऱ्हाडी मंडळी जेवणासाठी गेली. मात्र हा आनंद फार काळ काही टिकला नाही. कारण पंगत उठल्यानंतर काही वेळानंतर काहीजणांना उलट्या, मळमळ, जुलाबाचा त्रास सुरू झाला. एक-एक करून अशा रुग्णांची संख्या वाढली. तब्बल ४६ वऱ्हाडींना हा त्रास झाला. ही खळबळजनक घटना पाटण तालुक्यातील मल्हारपेठमध्ये रविवारी घडली.
याबाबत माहिती अशी की, मल्हारपेठ येथील एका मंगल कार्यालयात रविवारी (दि. १९) लग्न सोहळा आयोजित केला होता. लग्न समारंभासाठी आलेल्या पै-पाहुणे आणि मित्र परिवारातील लोकांनी दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत जेवण केले. त्यातील काही जणांना जेवणानंतर सायंकाळी चारनंतर अचानक त्रास जाणवू लागला. त्यामुळे समारंभस्थळी काही काळ खळबळ उडाली. त्यानंतर त्रस्त व्यक्तींना उपचारासाठी मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यातील काहींना इतर रुग्णालयात हलविण्यात आले होते. संबंधितांवर तातडीने उपचार सुरू केले. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांना घरी सोडण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्या विजया कुंभार, पाटण पंचायत समितीच्या सभापती विजया पवार, उपसभापती विजय पवार, गटविकास अधिकारी सरिता पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एन. टी. कांबळे आदींनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक डुबल, डॉ. स्नेहल घोरपडे, वैद्यकीय समुदाय अधिकारी, आरोग्य सहायक अविनाश कदम, वानखेडे व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी परिश्रम घेतले.
अन्न व औषध अधिकाऱ्यांची भेट
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेतले असून अद्याप तपासणी अहवाल आलेला नाही. या अहवालानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे.