सातारा : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतचा आदर अन् त्यांच्या विचारांचा वारसा सातासमुद्रापारही जपला जात आहे. भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त फेडेरेशन ऑफ इंडियन असोशिएशन्सच्यावतीने इंडीया डे परेडमध्ये न्यूयार्कमध्ये छत्रपती फाऊंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किर्तीरथासह मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशाच्या दणदणाटाने न्यूयॉर्क शहर दुमदुमून गेले.
रुद्रा डान्स ग्रुपच्या मुलींनी अनेक लोकनृत्ये सादर केली. लिविंगस्टनचा राजा ग्रुपच्या युवतींनी नववारीत लेझीम नृत्य सादर केले. परेड ग्रँड मार्शल न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी होचल यांनी न्यूयॉर्कच्या विकासात भारतीय समुदायाचे योगदान महत्वाचे असल्याचे सांगितले. यावेळी अभिनेत्री पूजा हेगडे, तारक मेहता का उलटा चश्माची संपूर्ण टीम तसेच मिशीगन राज्याचे हाऊस ऑफ रिप्रेजेटेटीव्ह खा. श्री ठाणेदार, न्यू हॅम्पशायर राज्याचे स्टेट रिप्रेझेंटेटीव्ह संतोष साळवी, भारताचे न्यूयॉर्क येथील उप-राजदूत विशाल हर्ष व वाणिज्य दूत राजलक्ष्मी कद उपस्थित होते.
रथावर शिवाजी महाराज, जिजाऊ, बाल शिवबा, मावळे, बालक, महिला व युवकांनी अभिनय व पारंपरिक वेशभूषा परिधान करुन ऐतिहासिक क्षण जिवंत करत महाराष्ट्राचा इतिहास व संस्कृतीचे प्रदर्शन सातासमुद्रापार केले. तसेच छत्रपती फाऊंडेशन संलग्न हॉस्पिटॅलिटी व आयटी क्षेत्रातील २० कंपनीचे संस्थापक, सीईओ, सीटीओ यांच्यासोबत विशेष चर्चासत्र पार पडले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग व मराठी भाषा मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छत्रपती फाऊंडेशनचे दहा राज्यांतील पदाधिकारी तसेच स्वप्नील खेडेकर, विनोद झेंडे यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, डॉ. आ. ह. साळुंखे यांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा, अशी मागणी मराठा सेवा संघाचे प्रांताध्यक्ष डॉ. विजय घोगरे, पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली आहे.