राधिका रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; १९ टपऱ्या हटवल्या; ७ टपऱ्या जप्त, वाहतुकीला दिलासा

by Team Satara Today | published on : 08 June 2026


सातारा : सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने सोमवारी राधिका रोड परिसरात मोठी कारवाई करत अनधिकृत टपऱ्यांवर हातोडा चालवला. राधिका चौक ते महाराणा प्रताप चौक या मार्गावरील एकूण १९ टपऱ्या हटविण्यात आल्या असून त्यापैकी ७ टपऱ्या जप्त करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण होत असल्याने पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र केली आहे. समर्थ मंदिर परिसरातील कारवाईनंतर सोमवारी राधिका रोड परिसरात ही मोहीम राबविण्यात आली.

अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांच्या नेतृत्वाखाली दहा कर्मचाऱ्यांचे पथक, दोन जेसीबी आणि आवश्यक यंत्रणेसह सकाळी कारवाईसाठी दाखल झाले. पालिकेच्या कारवाईची माहिती मिळताच काही व्यावसायिकांनी स्वतःहून आपल्या टपऱ्या हटवण्यास सुरुवात केली. राधिका चौक, १२ टक्के कॉर्नर तसेच महाराणा प्रताप चौक परिसरातील रस्त्यालगत उभारलेल्या अनधिकृत टपऱ्या हटविण्यात आल्या.

कारवाईनंतर अनेक वर्षांपासून अतिक्रमणांच्या विळख्यात अडकलेला हा मार्ग तुलनेने मोकळा झाल्याचे चित्र दिसून आले. पालिकेने हटविलेल्या टपऱ्यांपैकी सात टपऱ्या जप्त करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

दुपारनंतर पालिकेच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात मार्केट यार्डसमोरील गंमत जंमत परिसरातही अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. यावेळी काही अतिक्रमणधारकांनी विरोध दर्शविल्याने किरकोळ शाब्दिक वाद झाले. मात्र पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई सुरळीतपणे पार पडली.

राधिका रोड परिसरातील वाढती अतिक्रमणे आणि वाहतूक समस्यांबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत होत्या. त्यानुसार पालिकेने ही कारवाई केली असून शहरातील इतर भागांतही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र या मार्गावरील अवजड वाहनांचे बेकायदा पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेचे प्रश्न सोडविण्याची मागणी नागरिकांकडून कायम आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आंबेनळी घाट दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ८ लाखांची मदत; ना. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; सी.एम. सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य
पुढील बातमी
शूरवीर जिवाजी महाले कुटुंबाच्या समर्थनार्थ साताऱ्यात आंदोलन; तक्रारीची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी; संबंधितांना कायदेशीर संरक्षण देण्याचे आवाहन

संबंधित बातम्या