जिल्ह्यातील कृषि निविष्ठा विक्रेत्यांवर कृषि विभागाची कारवाई; 8 परवाने निलंबित

by Team Satara Today | published on : 18 April 2026


सातारा  :  सन  2026 - 2027 खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरिया व ईतर खताच्या विक्रीत अनियमीतता केल्याचे निदर्शनास आल्याने आणि खताची विक्री करताना पॉस मशिनचा वापर न करणे,पॉस मशिनवरील साठा व प्रत्यक्ष साठा,नोंदवहीतील साठा न जुळणे,शेतक-यांना योग्य प्रकारे बिले न देणे यामुळे जिल्हयातील 8  कृषि विक्रेत्यांवर जिल्हास्तरीय भरारी पथकांमार्फत कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.

सर्व होलसेल खत विक्रेत्यांची आढावा सभा घेण्यात आली होती. खरीप हंगामाकरीता जिल्ह्यात पुरेसा खत साठा उपलब्ध असल्याचे सांगून, खत वितरणाबाबत कोणत्याही प्रकारचा  काळाबाजार करू नये अन्यथा सक्त कारवाई करण्यात येईल अशा सुचना देण्यात आल्या होत्या. 

खरीप हंगाम 2026  पार्श्वभूमीवर जिल्हयातील सर्वच खते, बियाणे व किटकनाशक  विक्री दुकानांची तपासणी करण्याची मोहिम कृषि विभागाने हाती घेतली आहे.   शेतक-यांची अडवणूक होऊ नये,त्यांना खते आणि बियाणे योग्य किंमतीत मिळावीत. यासाठी जिल्हयात कृषि विक्रेत्यांची तपासणी करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथके तयार कृषि विभागांकडून तयार करण्यात आले होते.  या तपासणीमध्ये युरिया खताची विक्री करताना पॉस मशिनचा वापर न करणे, पॉस मशिनवरील साठा व प्रत्यक्ष साठा,नोंदवहीतील साठा न जुळणे,शेतक-यांना योग्य प्रकारे बिले न देणे या सारख्या बाबी उघडकीस आल्या. एप्रिल  महिन्यात तपासणीत दोषी आढळलेल्या 8 खत विक्री केंद्रावर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

सातारा जिल्ह्यातील २२ बियाणे उत्पादक कंपन्यांच्या तपासण्या पूर्ण झाल्या असून खते उत्पादक कंपन्यांच्या हंगाम पूर्व तपासण्या सुरु आहेत.   खरीप हंगामात कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी घ्यावयाच्या दक्षता,ठेवावयाचे अभिलेख यांचे मार्गदर्शन कृषि विभाग करत आहे. शेतक-यांनी बियाणे,खते व औषधे खरिदी करताना नामांकित कंपनीचा आग्रह  धरावा तसेच पक्के बिल घ्यावे जेणे करुन शेतक-याची फसवणूक होणार नाही. निविष्ठा विक्रेत्यांनी शेतक-यांना योग्य सेवा न दिल्यास कडक कारवाई करण्यात येईल,असा इशारा कृषि विभागाने दिला आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवा- पालकमंत्री शंभूराज देसाई
पुढील बातमी
महाराष्ट्रातील पत्रकारांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार- मंत्री शिवेंद्रराजे भोसले; मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उदघाटन

संबंधित बातम्या