कुख्यात गुंड गजानन मारणे याने दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचा केला सत्कार 

by Team Satara Today | published on : 30 August 2024


पुणे : अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणे कनेक्शन समोर आला आहे. राष्ट्रवादी आणि गजानन मारणे प्रकरण शांत होत नाही तोच भाजप नेते अन् मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार गजानन मारणे याने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप टीका होऊ लागली आहे. यापूर्वी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा सत्कार गजानन मारणे याने केला होतो. त्यानंतर शरद पवार गटातील खासदार निलेश लंके याचाही सत्कार गजा मारणे याने केला होतो. त्यावेळी भाजपने निलेश लंके यांच्यावर टीका केली होती.

कुख्यात गुंड गजानन मारणे याने मंगळवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला. त्याने पुष्पगुच्छ देऊन चंद्रकांत पाटील यांचे स्वागत केले. गजानन मारणे हा पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्यास आहे. चंद्रकांत पाटील कोथरूडचे आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा कोथरूडमधून निवडणूक लढवण्याची तयारी चंद्रकांत पाटील यांनी सुरू केली आहे. यापूर्वी या गुंडासोबत भाजपचेही कनेक्शन समोर आल्याने विरोधकांना टीका करण्याची संधी मिळाली आहे. या प्रकारानंतर काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्ला केला आहे. त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि गुंड गजानन मारणे यांच्या व्हिडिओ एक्सवर शेअर केला. त्यात ‘लाडके गुंड’ असे कॅप्शन दिले आहे. मंत्री महोदयांनी पुष्पगुच्छ स्वीकारून गजानन मारणेला हात जोडले, असा चिमटा काँग्रेसने काढला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी काही महिन्यांपूर्वी कोथरूडमध्ये गजा मारणे याची भेट घेतली होती. त्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल आले होते. त्यावरुन टीका झाल्यानंतर अजित पवार यांनीही पार्थ यांचे कान टोचले होते. त्यानंतर अहमदनगर लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारणे याची भेट घेतली. त्याच्याकडून निलेश लंके यांनी सत्कार स्वीकारला होता. त्यावेळी निलेश लंके यांनी गजा मारणे कोण आहे? हे आपणास माहीत नव्हते, असे स्पष्टीकरण दिले होते.

गजानन मारणे हा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात रहिवाशी आहे. मारणे  टोळीचा तो म्होरक्या आहे. त्याच्यावर पुणे पोलीस आणि इतर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये अटक झाली होती. या प्रकरणात त्याला शिक्षा झाल्यामुळे तो येरवडा कारगृहात होता. मारणे आणि मोहोळ टोळीचा पुण्यात दबदबा आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये  बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू होणार!
पुढील बातमी
पायवाटाची सावली’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध संगीतकार अमित बिस्वास यांनी लावली हजेरी

संबंधित बातम्या