तुमच्या मंत्र्यांना आवरा; मराठा आरक्षणावरील टीकेवरून खासदार सुप्रिया सुळे आक्रमक; मराठा-ओबीसी वादासाठी सरकारलाच जबाबदार धरले

by Team Satara Today | published on : 06 September 2026


नागपूर  : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या आठ दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. अद्यापही याबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, या आंदोलनाच्या संदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांनी गंभीर टीका केली आहे. यावर "तुमच्या मंत्र्यांना आवरा," असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. तसेच राज्यातील विविध प्रश्नांवरून सरकारला लक्ष्य करताना सरकारवर निशाना साधला. रविवारी नागपूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी विमानतळावर प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला.
पुण्यातील डीजे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वाद टोकाला गेला असल्याचे सांगत सुळे यांनी आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधितांना एकत्र बोलावून समंजसपणे तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. मात्र, या पुण्याबाबत सातत्याने चुकीच्या किंवा वाईट घटनांच्या बातम्या येत आहेत. वर्दीची भीती कुणालाच राहिली नाही, याची काळजी कुणालाच राहिलेली नाही, अशी टीका त्यांनी केली.
उत्सव साजरे करण्यास विरोध नसल्याचे स्पष्ट करताना नियमांचे पालन झाले पाहिजे, असे सुळे यांनी सांगितले. “नियम कायद्याने चालले पाहिजेत, मनमर्जीने  नाही. कुणावर हात उगारणे खपवून घेणार नाही. त्याचे उत्तर आम्ही शांततेच्या मार्गाने देऊ," असे त्या म्हणाल्या. संतोष चव्हाण यांच्या सत्काराच्या मुद्द्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र हा सुसंस्कृत राज्य असून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक उत्सव सुरू करण्यामागील उद्देश आपण विसरलो आहोत का, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरमध्ये डीजेबंदी ज्या पद्धतीने झाली, तशी अंमलबजावणी राज्य भरात करायला हवी, असेही त्या म्हणाल्या.
'सरकारने आत्मचिंतन करावे'
आदिवासी विद्यार्थी, मराठा, ओबीसी यांच्यासह विविध समाजघटकांच्या आंदोलनांकडे लक्ष वेधत सुळे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला. “राज्यात किती आंदोलने सुरू आहेत. मराठा, ओबीसी, आदिवासी रस्त्यावर उतरले आहेत. २०० आमदारांचे सरकार असूनही रोज आंदोलन कमी होत नाही. याचे आत्मचिंतन सरकारने केले पाहिजे," असे त्या म्हणाल्या. मराठा-ओबीसी वादासाठीही त्यांनी सरकारलाच जबाबदार धरले. “गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचेच सरकार आहे. डबल, ट्रिपल इंजिन सरकार आहे. समाजात तेढ निर्माण होत असेल तर त्याची नैतिक जबाबदारी सरकारची आहे," अशी टीका सुळे यांनी केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुद्द्याची लढाई मुद्द्याने लढा’; मी कोण आहे, यापेक्षा माझ्या प्रश्नांना तार्किक उत्तरे द्या - विद्यानंद बापट यांचे आव्हान

संबंधित बातम्या