सातारा : येथील सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानाला अस्वच्छतेने घेरले असून, ठिकठिकाणी बियर, दारू, प्लास्टिकचे ग्लास, बिसलरीच्या मोकळ्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या टाकल्या असून, या निमित्ताने तळीरामांनी जणू देशभरात ग्रामस्वच्छतेचा डंका पिटणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या अब्रूचे धिंडवडे काढत 'रात्रीस खेळ चाले' असे म्हणत आपली मनमानी सुरू केली आहे. या मैदानाच्या माध्यमातून प्रतिवर्षी लाखो रुपयांचा महसूल गोळा करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाला मैदानावरील अस्वच्छतेबाबत जराही चीड नसल्यामुळे स्वच्छता मोहिमेमध्ये पुढाकार घेणाऱ्या सातारा शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना अथवा ग्रुपने पुढाकार घेऊन मैदानाची साफ -सफाई करत जिल्हा परिषद प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालावे, अशी अपेक्षा मैदानावर पहाटेच्या वेळी फिरायला येणाऱ्या तरुणाईंसह ज्येष्ठ नागरिकांमधून होत आहे.
सातारा शहरामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या शेजारी अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. त्याला लागूनच प्रशस्त असे खेळाचे मैदान आहे. या मैदानावर सातारा शहरातील तरुणाईसह अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला पहाटेच्या वेळी फिरायला येतात. काही युवक मैदानावर क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल आदी खेळांमध्ये तल्लीन होऊन जातात. सातारा शहर व परिसरात अनेक करिअर अकॅडमी कार्यरत आहेत. त्यामध्ये जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील अनेक युवक- युवती प्रशिक्षण घेत आपल्या भावी करिअरची स्वप्न पाहत असतात. हे युवक- युवती सकाळच्या वेळी शारीरिक कसरती करण्यासह गोळा फेक, लांब उडी आदीचे प्रशिक्षण घेत असतात. एकूणच जिल्हा परिषद मैदान सातारकर यांच्या गळ्यातील ताईत झाले आहे. जिल्हा परिषदेच्या मैदानाचे वाढते महत्त्व पाहून जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मैदानावर रन -वे ( चालण्यासाठी मातीचा रस्ता) अत्यंत सुरेख केला आहे. सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉक केल्यानंतर थकवा आल्यास ज्येष्ठ नागरिकांसाठी सिमेंटच्या बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी मैदानाभोवती अत्यंत सुरेख रोपांची लागवड करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या मालकीचे हे मैदान असल्यामुळे काही वर्षांपूर्वी या मैदानाला संरक्षक भिंती बांधण्यात आल्या असून मैदानामध्ये जाण्यासाठी दोन मुख्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहेत. मैदान प्रशस्त असल्यामुळे या ठिकाणी विविध पक्षांच्या राजकीय सभा, विविध महोत्सव, विवाह समारंभ घेण्यात येतात तर फटाके स्टॉलही प्रतिवर्षी लावण्यात येतात. या माध्यमातून जिल्हा परिषद प्रशाला लाखो रुपयांचा महसूल प्रतिवर्षी प्राप्त होतो. विविध पक्षांच्या राजकीय सभा अथवा विविध महोत्सव झाल्यानंतर मैदान परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा पाहायला मिळतो. जिल्हा परिषद प्रशासन आरोग्य विभागाच्या माध्यमातून दोन-चार दिवसानंतर हा कचरा साफ करत असे. मैदानाला दोन मुख्य प्रवेशद्वार असून हे दोन्ही प्रवेशद्वार विविध कार्यक्रम असतील तर उघडण्यात येतात मात्र इतर वेळी बंद असतात. दोन्हीपैकी एका प्रवेशद्वाराला छोटे गेट केले असून त्यामधून मॉर्निंग वॉक अथवा खेळासाठी मैदानावर जाण्याची आणि येण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
कार्यक्रमांच्या माध्यमातून वर्षभरात मिळणारा महसूल आणि मैदानाचे महत्त्व पाहता या मैदानाच्या छोटा गेटच्या बाहेर कायमस्वरूपी एक सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज होती. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने तशी कोणतीही तसदी न घेतल्यामुळे अलीकडच्या काही वर्षांमध्ये या मैदानावर तळीरामांनी 'रात्रीस खेळ चाले' असे म्हणत जणू उच्छाद मांडला आहे. मैदानावरील सिमेंटच्या बाकड्या शेजारी, पाठीमागे रम, बियर, दारूंच्या, बिसलरीच्या मोकळ्या बाटल्या, निळ्या रंगाचे प्लास्टिकचे मोकळे ग्लास, तोंडी लावण्यासाठी वापरण्यात आलेली चकण्याची मोकळी पाकिटे ठिकठिकाणी पडली असून, बाकड्या शेजारीच पान, गुटख्याच्या पिचकारी मारून परिसर लाल भडक केला आहे. थोडक्यात सातारा जिल्हा परिषदेचे मैदान अस्वच्छतेचे आगार बनले असून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या प्रशासनाला ही गोष्ट माहित नाही की प्रशासनाने डोळ्यावर गांधारीची पट्टी ओढली आहे, असा संतप्त सवाल मैदानावर फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह महिलांमधून उपस्थित होत आहे.
कुसळांचे गवत अन् काँग्रेसचे साम्राज्य
मैदानाच्या सभोवती मोठी झाडे असून त्या झाडाखाली मोठ्या प्रमाणावर कुसळाचे गवत, तण वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असून आता तरी मैदानाच्या कडेला वाढलेल्या झाडांखालील कुसळाचे गवत, काँग्रेस, तण काढण्याची तसस्ती प्रशासनाने घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गवत आणि काँग्रेसच्या साम्राज्यामुळे सिमेंटच्या बाकड्यावर विश्रांतीसाठी बसणाऱ्या नागरिकांना टाचण, डास चावून हैराण करत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे मानले जाते.
ग्रामस्वच्छतेचा डंका फक्त नावालाच? स्वच्छतेचा वसा का टाकला !
सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासनामध्ये ग्रामपंचायत विभागाला अनन्य साधारण महत्व आहे. या विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदावर कार्यरत असताना टी. आर. गारळे, महादेव घुले यांनी अत्यंत उत्कृष्टपणे आपले काम चोखपणे पार पाडले. जिल्हाभरात गावोगावी ग्रामस्वच्छता अभियान राबवत नागरिकांमध्ये स्वच्छतेचा मंत्र रुजवण्यासाठी या दोन्ही अधिकाऱ्यांचा फार मोठा वाटा समजला जातो. केवळ केबिनमध्ये बसून बैठका न घेता गावोगावी जाऊन ग्रामसभा घेत या अधिकाऱ्यांनी विविध गावांना ग्रामस्वच्छता अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. अनेक गावांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अभियानामध्ये उत्स्फूर्त सहभागी होत ग्रामस्वच्छता अभियानामध्ये विविध पारितोषिके पटकवली आहेत. हे यश केवळ टी. आर.गारळे, महादेव घुले यांचेच नव्हते तर त्यांना त्या- त्या गावातील ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा, पोलीस पाटील यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे ग्रामस्वच्छतेमध्ये देशभरात सातारा जिल्ह्याचा डंका सातासमुद्रा पार पिटला गेला होता. सातारा जिल्ह्यातील ग्राम स्वच्छता अभियान हे अन्य जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवले गेले. ही त्यावेळी सातारा जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. आज मात्र जिल्ह्यात अत्यंत वेगळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. अधिकारी बदलले की प्रशासन बदलते.. हेच यावरून सिद्ध होते. त्यामुळे ग्राम स्वच्छतेचा डंका फक्त नावालाच? ग्रामस्वच्छतेचा वसा टाकला का! असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
प्रसाधन गृहाची अवस्था उकिरड्यापेक्षा वाईट
मैदानाच्या एका कोपऱ्यात फिरायला येणाऱ्या नागरिकांसाठी प्रसाधन गृह बांधण्यात आले आहे. त्या प्रसाधन गृहाची अवस्था आज उकिरड्यापेक्षा वाईट झाली आहे. या प्रसाधन गृहामध्ये एवढी दुर्गंधी येत आहे की आत जाणारा नागरिक त्या दुर्गंधीने हैराण होत नाकाला रुमाल लावून बाहेर पळत येताना दिसतो. बेसिन, संडास पूर्णपणे चोकअप झाले आहे. सगळ्या प्रसाधन गृहामध्ये पाणी साचून त्यावर डासांचे थवे बसत आहेत. तळीरामांनी प्रसाधनगृहही सोडले नसून याही ठिकाणी दारूच्या, बिसलरीच्या मोकळ्या बाटल्या पाहायला मिळत आहेत. एकूणच जिल्हा परिषदेवर अध्यक्ष, उपाध्यक्ष अथवा पदाधिकारी कार्यरत नसल्यानंतर प्रशासकीय राज कसे चालते हे याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळते.