बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण राज्य हादरले असतानाच, परळी तालुक्यात आणखी एका सरपंचाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. औष्णिक केंद्राची राख वाहतूक करणाऱ्या टिप्परने शनिवारी रात्री सौंदाण्याचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सरपंचांचा जागीच मृत्यू झाला.
मिरवड फाट्याजवळ रात्री घडलेल्या या अपघातामुळे सरपंच क्षीरसागर यांचा दुचाकीसह चेंदामेंदा झाला. शेतातून घरी परतत असताना राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. हा अपघात होता की घातपात, याचा तपास पोलीस करत आहेत.
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. देशमुख यांची हत्या पवनचक्कीशी संबंधित वादातून झाल्याचे समोर आले होते. जिल्ह्यात एका मोठ्या गँगच्या सक्रियतेबाबत नागरिकांकडून सातत्याने आक्रोश व्यक्त केला जात आहे.
सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या मृत्यूनंतर औष्णिक केंद्रातील राखेच्या अर्थकारणावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या परिसरातील 8-9 गावांवर राखेमुळे प्रदूषणाचा मोठा फटका बसला असून, शेतातील पिके व पाण्याचे स्रोत राखमय झाले आहेत. या समस्येविरोधात काही सरपंचांनी उघडपणे आवाज उठवला होता. या दुहेरी घटनांमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून क्षिरसागर यांचा अपघात की घातपात, याचा निष्कर्ष काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.