लोणंद : शिरवळ- सातारा महामार्ग लोणंद शहराबाहेरून वळविण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभेचे प्रमुख व सुवर्णगाथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत यांनी लोणंदचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
डॉ. सावंत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शिरवळ- सातारा हा महामार्ग लोणंद शहरातून जात आहे. तसा हा रस्ता मंजूर झाला आहे. हा महामार्ग २२ मीटर रुंदीचा असून, शिरवळ चौक ते गोटेमाळ, तसेच बसस्थानक ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक असा लोणंद शहरातून प्रस्तावित आहे; परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रुंदीकरण झाले, तर शहरातील मुख्य बाजारपेठेतील अनेक दुकाने व व्यावसायिकांना अतिक्रमण मोहीम राबवून हटवल्याशिवाय हा रस्ता होऊ शकणार नाही.
परिणामी शहराची मुख्य बाजारपेठ उद्ध्वस्त होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर या रस्त्यावरून पुणे- बंगळूर महामार्गावरून येणाऱ्या वाहनांच्या वाढलेल्या रहदारीमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्यावर मोठ्या वाहनांच्या वाहतुकीची असणारी समस्या गंभीर होऊन लोणंदच्या नागरिकांचे हाल होणार आहेत. जीवित आणि वित्तहानी करून होणारा हा महामार्ग विकासाकड़े नव्हे, तर शहराला भकासाकडे घेऊन जाणार आहे, तरी देखील शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हा महामार्ग शहरातून न जाता बाहेरून काढण्यात यावा.
या संदर्भात नगरपंचायतीचाही तसा ठराव करण्यात यावा, अशी मागणीही डॉ. सावंत यांनी केली. शहराच्या विकास आराखड्यामध्ये बायपास रोड नियोजित करण्यात आला आहे. त्याचा वापर या महामार्गासाठी करण्यात यावा. मुख्याधिकारी गायकवाड यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली. या वेळी प्रा. रघुनाथ शेळके -पाटील, राजू इनामदार, राजू खरात, स्वप्नील क्षीरसागर, भावेश दोशी, उमेश डोईफोडे आदी उपस्थित होते.