सातारा : मराठी भाषा हा आपल्या संस्कृतीचा आत्मा, अस्मिता, अभिमान आहे. ही भाषा संपली तर आपले अस्तित्व संपेल याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. मराठी केवळ संवादाची भाषा न राहता ती रोजगाराची भाषा झाली पाहिजे. तिचे व्यावसायीक महत्व टिकवून ठेवत मराठीचे वैभव, दरारा आणि मराठीचा दिमाख कायम ठेवणे हे केवळ आपले कर्तव्य नसून ती अत्यंत पवित्र अशी जबाबदारी आहे असे सांगून या साहित्य संमेलनाला 3 कोटी रुपयांचा शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे. यापुढेही अशा साहित्य संमेलनांना निधी कमी पडणार नाही, हे पाहणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे भाषेच्या विकासासाठी व संवर्धनासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सातारा येथे 1 ते 4 जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप कार्यक्रम उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानीत ज्येष्ठ साहित्यीक रघुवीर चौधरी होते. यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, आमदार महेश शिंदे, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट, भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उद्योजक, मंडळाचे कार्यवाहक सुनिताराजे पवार व संमेलनाचे संरक्षक फरोख कूपर आदी उपस्थित होते.
साताऱ्याच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पायाभरणी झाली. त्या पवित्र भूमीत 99 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, हे संमेलन केवळ साहित्यिक कार्यक्रम नाहीतर मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा सांस्कृतिक आत्मविश्वासाचा आणि विचार स्वातंत्र्याचा उत्सव आहे. हे संमेलन साहित्याचा आणि मराठी भाषेचा महाकुंभ आहे. मराठी भाषेच्या सर्व प्रवाहांचा संगम आहे. या संमेलनाला साताऱ्याच्या कंदीपेढ्याचा गोडवा लाभला आहे. इथल्या लोकांच्या हृदयात प्रेमाची स्ट्रॉबेरी भरलेली आहे. शंभरावे साहित्य संमेलन देखील जोरदार झाले पाहिजे. त्यालाही शासन काही कमी पडू देणार नाही, ग्वाहीही त्यांनी दिली.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्र शासनाचे आभार मानले. ते म्हणाले, मराठी भाषेचे व्यावसायीक महत्व टिकवून ठेवायचे असेल तर मराठी साहित्य, नाटक अशा सर्व माध्यमांना आपण मोठे केले पाहिजे. नव्याने येणाऱ्या साहित्यिकांना मोठे करण्याची जबाबदारी मराठी भाषीकांची आहे. मराठी केवळ ही संवादाची नव्हे तर अर्थाजनाची, रोजगाराची भाषा झाली पाहिजे. मराठी बोलणारा, ऐकणारा, मराठी कलांचा आदर करणारा मराठी समाज टिकविला, वाढविला पाहिजे. अखिल भारतीय साहित्य परिषदेच्यावतीने या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सन्मान करण्यात आला.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती अजीबात होणार नाही. मराठी भाषेचा सन्मान वाढविला जाईल. राज्यातील सर्व एसटी बसस्थानकाच्या आवारांमध्ये मराठी ललीत पुस्तकांच्या विक्रीसाठी 50 टक्के सवलतील स्टॉल उपलब्ध करुन दिले जातील. लेखन आणि प्रकाशन व्यवसायावर लागू असलेला कर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यावेळी त्यांनी 99 अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनाद्दल आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन केले.
मराठी भाषा मंत्री श्री. सामंत म्हणाले, सातारा येथील 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला मराठी भाषा विभागाने 3 कोटी रुपये दिले आहेत. येणारे साहित्य संमेलन हे शंभरावे संमेलन आहे. या निमित्ताने मराठी भाषा विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये येणाऱ्या संमेलनात झालेल्या शंभर संमेलन अध्यक्षांसाठी ग.दी. माडगूळकर यांच्या नावे सन्मान निधी दिला जाईल. शंभराव्या संमेलनापासून संमेलनाचे जे अध्यक्ष असतील त्यांच्यासाठी महादजी शिंदे यांच्या नावे सन्मान निधी दिला जाईल. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे स्मारक सातारा येथे होण्यासाठी सातारा एमआयडीसीतील दीड एकर जमिन देण्यात येईल. स्व. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रात अनुवाद समिती असावी अशी भूमिका घेतली होती. त्याद्वारे ग्रामीण भागातील साहित्य विविध भाषांमध्ये रुपांतरीत करुन प्रकाशनासाठी शासन निधी उपलब्ध करुन देईल अशी भूमिका घेतली होती. याच भूमिकेतून त्यांनी अनुवाद समिती स्थापन केली होती. कालांतराने ती बंद पडली. सातारा येथील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावे अनुवाद समिती पुन्हा सुरु करण्यात येईल. यावेळी त्यांनी साहित्य समितीच्या पदाधिकाऱ्यांना साहित्य संस्थांच्या कामात कोणीही लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करीत नाहीत. या उलट राज्यकर्त्यांची ताकद साहित्य संमेलनासोबत असली पाहिजे, अशी भूमिका मांडली. साहित्य परिषदेच्या पुणे येथील इमारतीसाठी 1 कोटीचा निधी देण्याचे पत्र यावेळी दिले.
यावेळी स्वागताध्यक्ष श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सातारा येथील साहित्य संमेलनात रसिकांना साहित्यिक मेजवानी मिळाली. साहित्य संमेलनातील प्रत्येक कार्यक्रम, ग्रंथ दालन, कवी कट्टा, गझल कट्टा, प्रकाशन कट्टा, ग्रंथ दिंडी, कवी संमेलन, बाल मंच, कथा कथन, मुलाखत, पुस्तक चर्चा, परिसंवाद, हास्य जत्रा, परिचर्चा अशा सर्वंच कार्यक्रमांना रसिकांनी दिलेल्या भरभरुन प्रतिसादामुळे यशाची उंची गाठता आली. या संमेलनाने नवीन पायंडे घालून दिले. संमेलन यशस्वी करण्यासाठी पाठीशी राहणारे महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, साताऱ्यातील उद्योजक, सहकारी संस्था, बँका आणि सर्वसामान्य सातारकर, देशाच्या कोपऱ्यातून आलेले साहित्यिक, लेख, प्रकाशक अशा सर्वांचेच त्यांनी मनपूर्वक आभार मानले. मागील चार दिवसात जवळपास आठ लाख मराठी साहित्य रसिकांनी या संमेलनाला भेट दिल्याचे सांगून मंत्री श्री. भोसले म्हणाले, हा साहित्य संमेलनातील रसिकांच्या सहभागाचा उच्चांक ठरु शकतो. महाराष्ट्रात केवळ मराठी भाषेचीच सक्ती असेल या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेचे आपण सर्वांनी स्वागत केले पाहिजे असे सांगून अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे यजमान पद यावर्षी साताऱ्याला मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ साहित्यिक श्री. चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमित त्यांच्या प्रती आदर व्यक्त करुन महाराष्ट्र शासन व येथील सर्वसामान्य रसिक मराठी भाषेला देत असलेला आदर पाहून आशावाद व्यक्त केला. महाराष्ट्राची व मराठी भाषेची भरभराट होवो. अशा शुभेच्छाही व्यक्त केल्या.
भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. श्री. जोशी म्हणाले, हे साहित्य संमेलन साहित्य, वाचक, रसिक केंद्रीत झाले. या संमेलनात, सामाजिक, राजकीय अशी सर्वच मुळे खोलवर गेली आहेत. या संमेलनात साहित्य महामंडळाने मराठी भाषेचा कळवळा ठामपणे मांडला आहे. या संमेलनाची स्पंदने दीर्घकाळ रसिकांमध्ये रेंगाळत राहतील, त्यातून अनेक साहित्यिक निर्माण होतील. शंभरावे साहित्य संमेलन पुण्यात होणार असून. पहिले साहित्य समेलनही पुण्यात झाले होते. या निमित्ताने एक वर्तुळ पूर्ण होईल. शंभराव्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दुबईत विशेष साहित्य संमेलन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संमेलनाला भरीव मदत करणारे, फरोख कुपर, परांजपे ॲाटोकास्टचे श्री. ऋषीराज यांच्यासह जिल्हाधिकारी श्री. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन, पोलीस अधीक्षक श्री. दोशी, नगर प्रशासन अधिकारी श्री. बापट, डॉ. राजेंद्र सरकाळे, राजेंद्र लाखे, पद्माकर कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
साहित्य संमेलन समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, सूत्रसंचालन स्नेहल दामले व साहित्य संमेलनात सुनिताराजे पवार यांनी विविध ठराव मांडले.