सातारा : बौद्ध गया येथील महाविहाराच्या नियंत्रण आणि व्यवस्थापनाच्या संदर्भात स्थानिक पातळीवर जोरदार आंदोलने सुरू आहेत. हे महाविहार बौद्ध भिक्खूंच्या हाती देण्यात यावे, अशी मागणी आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सातार्यात वंचित बहुजन आघाडीसह समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा यांच्या समन्वयातून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव गणेश भिसे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव गणेश भिसे म्हणाले, गया येथील बोधिवृक्षाखाली गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झाले. सम्राट अशोकांनी या विहाराचे उत्कृष्ठ बांधकाम करुन घेतले होते. जगभरातील बौद्ध अनुयायी आणि पर्यटक या स्थळाला भेट देत असतात. मात्र, या स्मारकाचे व्यवस्थापन काही ब्राह्मणवाद्यांकडे देण्यात आले आहे. ते बदलून या महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी 1992 पासून आंदोलने सुरू आहेत. मात्र व्यवस्थापनाने बदल केलेला नाही. ज्या कर्मकांडांना गौतम बुद्धांनी नाकारले, ती येथे सुरू आहेत. त्यामुळे महाविहार कायदा 1949 रद्द करावा, महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय पातळीवरील बौद्ध आचार्यांना सोबत घेऊन करावे, जागतिक वारसा कायम ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विशेष विकास निधी सुविधा तात्काळ देण्यात याव्यात, अशा मागण्या भिसे यांनी केल्या.
याबाबत काढण्यात आलेल्या निवेदनावर गणेश भिसे यांच्यासह भीमराव घोरपडे, अरविंद आढाव, शरद गाडे, दीपक चव्हाण, अरुण मोरे, बबनराव करडे, नंदा सर्जे, विमल लंकेश्वर, जयश्री किरवे, बाळासाहेब तापकिरे, बापू किरवे, हनुमंत तोरणे, शैला सोनवणे, सुमन शिंदे, विजय वानखेडे, सुरेश बैले, संजय जाधव यांच्यासह बहुसंख्येने स्वाक्षर्या आहेत.