सातारा : आगामी गणेशोत्सव शिस्तबद्ध, सुरक्षित आणि उत्साहात साजरा करण्यासाठी सातारा सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समिती व पोलिस प्रशासनाची संयुक्त समन्वय बैठक गुरुवारी (दि. १३) पार पडली. जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत गणेश आगमन सोहळ्यासाठी दि. २९, ३० ऑगस्ट व ८, ९ आणि ११ सप्टेंबर या पाच तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सर्व मंडळांना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन करत प्रशासनाकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. लवकरच प्रशासन आणि गणेश मंडळांची संयुक्त बैठक घेण्याचे तसेच ‘एक खिडकी योजना’ राबवण्याबाबतही या वेळी सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे, शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्यासह समितीचे अध्यक्ष महेश साळुंखे, उपाध्यक्ष अभिजीत बारटक्के, सचिव अक्षय गवळी, नगरसेवक विश्वतेज बालुगडे, चंद्रशेखर घोडके, विजय भोसले, सुजित परदेशी, मुन्ना बागवान, ऋषिकेश डांबे, पप्पू इंगवले आदी उपस्थित होते.
शिस्त, समन्वय आणि सुरक्षितता या त्रिसूत्रीच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने यंदाचा गणेशोत्सव सातारा शहराच्या लौकिकाला साजेसा आणि आदर्श पद्धतीने साजरा करूया, असे आवाहन सातारा सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समितीतर्फे करण्यात आले.
या दिवशी मिरवणूक नाही..
नागरिकांना गणेशोत्सवाची खरेदी सुलभतेने करता यावी, व्यापाऱ्यांना व्यवसाय करता यावा आणि शहरातील वाहतूक कोंडी टळावी, यासाठी १२ व १३ सप्टेंबर रोजी कोणत्याही मंडळाने आगमन मिरवणूक काढू नये, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या निर्णयाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला आहे.