संपूर्ण जगावर सायबर चोरट्यांची दहशत

सातारा सायबर पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 3 कोटी रुपये नागरिकांना दिले मिळवून

by Team Satara Today | published on : 11 October 2025


सातारा : देशासह संपूर्ण जगावर सायबर चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षात सायबर चोरट्यांनी करोडो रुपये चोरले असताना त्याचा तोडीस तोड तपास करत सातारा सायबर पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 3 कोटी रुपये नागरिकांना परत मिळवून देत कमाल केली आहे. यामुळे ऑनलाईन फसू नका अन्‌‍ फसलात तर घाबरु नका. 

सध्याचे युग हे सायबर युग आहे. ऑनलाईन फ्रॉडद्वारे एकाचवेळी कोट्यवधी रुपयांची रक्कम काही मिनिटांमध्ये स्वाहा: होत आहे. एखादी लिंक, ओटीपी, माहिती आपल्याकडूनच गेल्यानंतर अशा घटना घडतात. यामुळे सायबर सुशिक्षित होणे काळाची गरज बनली आहे. मुळात ऑनलाईन बाबींचा वापर येत नसेल तर वापर करु नका. तसेच ओळखीचा, अनोळखी व्यक्तींचा फोन, मेसेज, कोणत्याही प्रकारची संशयास्पद लिंक आल्यास त्या प्रतिसाद देवू नका. खात्री झाल्याशिवाय पैसे देणे-घेणे या बाबी टाळणे योग्य राहते. 

साताऱ्यातील ही घटना. एका व्यक्तीचे ऑनलाईनद्वारे 38 हजार रुपये अचानक गेले. तक्रारदार व्यक्तीने सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार देवून त्यासंबंधी कागदपत्रे पोलिसांना दिली. सायबर पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर पैसे गेलेल्या तक्रारदाराने मोबाईलमध्ये कोणतीही लिंक, मेसेज ओपन केला म्हणून पैसे गेले नसल्याचे लक्षात आले. सायबर पोलिसांनी तक्रारदारांना बँकेच्या नावाने अर्ज करायला सांगून बँकेच्या चुकीमुळे पैसे गेल्याने तपास करायला बँकेला सांगितले. त्यानुसार बँकेने तपासणी केली असता बँकेची चूक असल्याचे समोर आले व तक्रारदारांंचे पैसे परत त्यांच्या खात्यावर जमा झाले.

सायबर चोरट्यांनी पैसे चोरल्याचे समोर आल्यानंतर तक्रारदारांनी घाबरुन जावू नये. यासाठी तात्काळ 1930 किंवा 1945 या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन तक्रार दाखल करावी. या टोल फ्री क्रमांकावर वैयक्तिक माहिती व बँक खाते क्रमांकासह आपले पैसे कसे गेले आहेत? अशा दोन टाईपमध्ये माहिती भरावी लागते. 24 तास ही सेवा सुरु असते. यामुळे आपले चोरीला गेलेले पैसे तात्काळ थांबण्यास मदत होवू शकते. यानंतर तक्रारदाराने स्थानिक पोलिस ठाणे किंवा सायबर पोलिस ठाण्यात जावून पाठपुरावा करावा.

रक्त तपासणी करणाऱ्या लॅब चालकाच्या बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी डल्ला मारत दीड लाखांची रक्कम चोरली. सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज करुन संबंधित कागदपत्रे दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पैसे शोधण्यास सुरुवात केली. पैसे ज्या तीन खात्यावर गेले होते, ते परराज्यातील होते. सायबर पोलिसांनी तात्काळ पैसे रोखण्यासाठी ई- मेल केले. दोन खात्यात गेलेले पैसे वाचले. यातून सुमारे 90 हजार रुपयांची रक्कम मिळाली. त्यामुळे लॅब चालक फसले अन्‌‍ थोडक्यात वाचले असेच म्हणावे लागेल. 

ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर तक्रारदार यांनी तात्काळ टोल फ्री क्रमांकावर फोन करुन झालेल्या घटनेची माहिती भरावी. वेळेत तक्रार दाखल झाल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता राहते. सातारा जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या तक्रारदारांना बहुतांशी रक्कम मिळण्यास मदत होत आहे. 

पोनि राजेंद्र सावंत्रे सायबर पोलिस स्टेशन, सातारा.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बेकायदा संपाविरुद्ध महावितरण औद्योगिक न्यायालयात
पुढील बातमी
वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांचा नागरी सत्कार संपन्न

संबंधित बातम्या