सातारा : सातारकर मताच्या रूपाने भाजपचे सर्व उमेदवार विजयी करून त्यांना निश्चित आशीर्वाद देतील. सातारा शहरातच नव्हे तर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी स्वबळावर काही अपवाद वगळता लढत असून तेथेही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा वरचष्मा राहील, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने आयात उमेदवार दिले आहेत. त्यांना जिल्ह्यात बर्याच ठिकाणी तगडे उमेदवार मिळालेले नाहीत, येथेच त्यांचे अपयश स्पष्ट झाले आहे, अशी टीका त्यांनी केली.
येथील फर्न हॉटेलमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पत्रकार परिषदेत शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. यावेळी खा. उदयनराजे भोसले, भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ताजी थोरात, लोकसभा संयोजक सुनील काटकर, नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते व जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी धैर्यशील कदम उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, भारतीय जनता पार्टी सातारा नगरपालिका तसेच जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाबळेश्वर, पाचगणी वगळता स्वबळावर लढवत आहे. सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार निश्चित यश मिळवतील आणि भाजपचे राजकीय वर्चस्व सिद्ध करतील. म्हसवड पालिका कार्यक्षेत्रात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, कराडमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले, कराड उत्तर मध्ये मनोज दादा घोरपडे त्यांच्या पद्धतीने काम करीत असून भारतीय जनता पार्टीचे चांगले वातावरण तयार झाले आहे. महाबळेश्वर व पाचगणी येथे नऊ नगरसेवक कमळ चिन्हावर लढत असून येथे स्थानिक आघाड्यांशी आपण युती केली आहे. महाविकास आघाडीने सातार्यासाठी त्यांची सत्ता असताना काय केले, असा प्रश्न विचारून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, महायुतीने सातारा जिल्ह्याला व शहराला भरभरून निधी दिला आहे. महाविकास आघाडीला ज्यावेळी सातार्यात सुवर्णा पाटील यांच्यासारखा भाजपचाच उमेदवार आयात करावा लागला, तेथेच त्यांचे अपयश स्पष्ट झाले आहे. त्यांना सक्षम उमेदवार मिळालेले नाहीत. सुवर्णा पाटील या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ कार्यकारणीच्या सन्माननीय महिला सदस्य आहेत. त्यांना संधी न मिळाल्याने त्या नाराजीतून तिकडे गेल्या असतील. पण महाविकास आघाडी त्यांना न्याय देऊ शकणार नाही, अशी टीका करत त्यांनी सुवर्णा यांनी स्वगृही भाजपमध्ये पुन्हा यावे, असे आवाहन केले.
नाराज उमेदवारांचाही सन्मान करू : खा. उदयनराजे
तिकीट वाटपामध्ये दुजाभाव झाला, माझ्यावर अन्याय झाला, असे कोणीही वाटून घेऊ नये. लोकांची कामे करणारा नगरसेवक या निकषावरच सातारा शहरात उमेदवारीचे वाटप करण्यात आले आहे. 50 जागांसाठी तब्बल 400 अर्ज होते. त्यामुळे उमेदवारी जाहीर करताना खूप विचार करुन अंतिम निर्णय घ्यावे लागले. ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये. त्यांना वेगवेगळ्या समित्यांवर सामावून घेत त्यांचाही सन्मान राखला जाईल, असे खा. उदयनराजे म्हणाले
अपक्षांच्या संदर्भात माघारीचे प्रयत्न सुरू : ना. शिवेंद्रसिंहराजे
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, अपक्ष उमेदवारांना विनंती करून भारतीय जनता पार्टीच्या मनोमिलनातील सदस्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनाला अपक्ष उमेदवार चांगला प्रतिसाद देत असून शुक्रवार दिनांक 21 रोजी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. तेथेही आमचे प्रयत्न सुरू आहेत. जे प्रतिसाद देतील त्यांना पक्षात सामावून घेतले जाईल. जे अपक्ष रणांगणात राहतील त्यांच्या संदर्भात पक्षश्रेष्ठींच्या सूचनेप्रमाणे योग्य ती कार्यवाही केली जाईल.
ज्यांनी चर्चा केली ते आमच्या सोबत
जिल्ह्यात महायुतीचा फॉर्म्युला का अवलंबला नाही, या प्रश्नावर बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, आम्ही मित्र पक्षांशी चर्चा करून सातार्यात काही उमेदवार दिले आहेत. रिपाइं आठवले गट आमच्या सोबत होता. जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांनी सुचित केलेले सदरबाजार येथील प्रतीक गायकवाड यांना तेथे उमेदवारी देण्यात आली आहे. ज्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही आणि काही निर्णय स्वतंत्ररित्या घेतले त्यांच्याशी आम्ही ध्येयधोरणाची चर्चा कशी करणार? प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवला तर आम्हीही आमची संघटनात्मक बांधणी सुरू ठेवली आहे, अशी खोचक राजकीय टिप्पणी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालकमंत्र्याचे नाव न घेता केली.