मुंबई : कल्याण परिसरात मनापाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. चिकणघर परिसरातील नागरिकांच्या जीवाशी मनपा खेळत असल्याचा आरोप केला जात आहे. चिकणघर परिसरातील नव एव्हरेस्ट सोसायटी परिसरात नागरिकांना दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या दुषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले आहे.
या परिसरातील नागरिकांना उलट्या, ताप, टायफॉइड आणि डायरियासारखे आजार होत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पालिकेकडे याबाबत वारंवार तक्रार दाखल करुनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे. त्यामुळे जीवावर बेतणाऱ्या समस्येबाबत पालिकेने केलेला हलगर्जीपणा पाहता संतापलेल्या नागरिकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या दूषित पाणीपुरवठ्यामुळे या इमारतीमधील रहिवाशांना, लहान मुलांना ,वृद्ध नागरिकांना उलट्या ,टायफाईड ,ताप, डायरिया सारखे आजार झालेत. त्यामुळे दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .अनेकदा नागरिकानी याबाबत केडीएमसीकडे तक्रार करूनही केडीएमसी दुर्लक्ष करत असल्याने दाद कुणाकडे मागायची असा सवाल नागरिक करत आहेत. याबाबत भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून भाजपचे शहर अध्यक्ष वरुण पाटील यांनी केडीएमसीने दूषित पाणीपुरवठ्याची समस्या येत्या दोन दिवसात सोडवली नाही तर भाजपतर्फे उग्र आंदोलन छेडण्यात येईल अशी सक्त ताकीद कल्याण डोबिंवली मनपाला दिलेला आहे.
गेले दोन महिने या गढूळ पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. पालिकेला तक्रार दाखल केल्यानंतर अधिकारी आले आणि त्यानंतर पाण्याचे नमुने घेण्य़ात आले होते. या सगळ्यानंतर पालिकेकडून पुढे कोणतीही ठोस पाऊलं उचलण्यात आली नाही, असं येथील रहिवाशांनी सांगितलं आहे. पिण्याचं पाणी उकळून गाळून घेतलं तरी त्याचा रंग हा पिवळा दिसतो. इतक्या दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
दरम्यान या सगळ्यावर भाजपचे शहर अध्य़क्ष वरुण पाटील यांनी याबाबात पालिकेला सक्त ताकीद दिली आहे. शहराध्यक्ष म्हणाले की, आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने नेल्यानंतर जवळपास वीस दिवस उलटूनही कोणत्याही प्रकारे अहवाल सादर केला नसल्यामुळे दोन दिवसांत काय़ तो पालिकेने निर्णय घ्यावा. जर दोन दिवसात कल्याण पश्चिम परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न सुटले नाहीत तर पालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.