सातारा : शेतकऱ्यांमुळे आज महाराष्ट्र हे विकसीत राज्य झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत उपयोग करावा. शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना एकजुटीने करावा. त्याचबरोबर उत्पादीत मालासाठी एकत्र येऊन बाजारपेठेचा प्रश्न सोडवावा. फलटण तालुक्यातील धुमाळवाडी गाव जसं फळांच ओळखलं जात आहे. त्याप्रमाणे आपल्या गावाला पिके, फळे आणि फुलांचे गाव म्हणून नवीन ओळख शेतकऱ्यांनी निर्माण करुन द्यावी, असा सल्ला सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिला.
सातारा जिल्हा परिषदेतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कृषी दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील १९ बळीराजांना आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद, जिल्हा कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, 'आत्मा'चे प्रकल्प संचालक अजय शेंडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, कृषी उपसंचालक सिध्देश्वर मोकळे, विस्तारचे तंत्र अधिकारी अनिल काळे आदी उपस्थित होते.
याशनी नागराजन म्हणाल्या, खटाव तालुक्यात काही शेतकऱ्यांनी फुलशेती केली आहे. अर्थात या फुलशेतीला पाणी देण्यासाठी पाण्याचे तळे निर्माण केल्यामुळे तिथे शक्य झाल्याचे पाहयला मिळाले आहे. त्याप्रमाणे इतर गावांतील शेतकऱ्यांनी एकजुटीने पिकांचे उत्पादन घेण्याबरोबर फळे, फुले यांचे उत्पादन घेवून त्या नावाने गावाची ओळख निर्माण करावी. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्याकडे 'जय जवान, जय किसान' असे म्हटले जाते. ही दोन्हीही बाजू आपल्या सातारा जिल्ह्यात पहायला मिळत आहेत. शेतीक्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आले आहे. याची माहिती इतर शेतकऱ्यांनाही द्यावी. शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाककडेही वळावे. एकत्रित होऊन अनेक नवीन बाजारपेठ आणि पर्यायही शोधावेत.
विश्वास सीद म्हणाले, शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान वापरुन शेतीतून उत्पादन वाढवावे. त्यासाठी एआय (कृत्रिम बुध्दीमत्ता) याचाही वापर करावा. एकत्र येऊन गटशेतीही करुन यशस्वी व्हावे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्यासह इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. तसेच आदर्श पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनीही मनोगते व्यक्त केली. तरुणांनी शेतीत यायला हवे. आपली माती वाचविण्याची गरज आहे. मातीची तपासणी करा. सुपिकता वाढवा. त्याचबरोबर खर्च कमी करुन उत्पादकता वाढवा, असे आवाहनही या शेतकऱ्यांनी इतरांना केले.
सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने डॉ. जे. के. बसू सेंद्रीय शेती, दिवंगत यशवंतराव चव्हाण फलोत्पादन, पुष्पोत्पादन आणि दुग्धोत्पादन अशा चार विविध प्रकारात पुरस्कार देण्यात आले. प्रदीप शेलार, सुरेश बोराटे, अमोल भोसले, अशोक जाधव, संदीप चव्हाण, बबन मुळीक, महेंद्र धुमाळ, उत्तम गाडे, बाळकृष्ण बंडगर, शंकर जाधव, सचिन शेलार, अजित पाटील, संजय पवार, शिवम जाधव, दीपाली भागवत, स्वाती पवार, मनिषा पवार, मानसी कणसे या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.