सातारा : राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आणि रामदास स्वामींची समाधी असलेल्या सज्जनगड तीर्थक्षेत्रावरील श्री समर्थ सेवा मंडळ व सातारा येथील दिवेकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने काल रविवारी सकाळी सज्जनगड रन 2024 चे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाला सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातून उपस्थित असलेल्या शेकडो धावपटूंनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत हा उपक्रम यशस्वी केला. रविवारी पहाटे या सज्जनगड रनचे उद्घाटन समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी, गजाननराव बोबडे, प्रवीण कुलकर्णी गुरुजी, समर्थ भक्त विद्याधर बुवा वैशंपायन तसेच समर्थ मंडळाचे सहकारी संतोष वाघ, राजाभाऊ कुलकर्णी, उत्तम तारळेकर व सज्जनगड वरील रामदासी मंडळींच्या उपस्थितीत गजवडी येथील अभयसिंह राजे भोसले विद्यालयाच्या वरील बाजूस असलेल्या स्वागत कमानी पासून ध्वज फडकावून करण्यात आली.
तत्पूर्वी सर्व स्पर्धकांनी विद्यालयाच्या प्रांगणात वॉर्मप करून स्पर्धेची तयारी केली. स्पर्धा सुरू होताना मान्यवर उपस्थित यांच्या हस्ते तसेच सर्व स्पर्धकांनी समर्थ रामदास स्वामींच्या नावाचा जयजयकार करत मनाचे श्लोक म्हणत ही अनोखी सज्जनगड रन 2024 सुरू झाली. हिरव्यागार निसर्गाने नटलेल्या या सज्जनगडच्या अतिशय चढण असलेल्या रस्त्यावरूनही हे धावपटू अतिशय लीलया हे अंतर धावत कापत होते. मार्गांमधील ज्ञानश्री इंजीनियरिंग इन्स्टिट्यूटच्या प्रांगणाबाहेर मार्गावर स्पर्धकांसाठी पाणी तसेच या धावपटूंना उत्साहित करण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण मार्गावरून केशरी रंगाचे टी-शर्ट घातलेल्या धावपटूंना पाहताना अतिशय एक वेगळेच रम्य असे खेळाडूंचे दर्शन उपस्थिताना झाले. त्यानंतर या स्पर्धेतील शेवटचा अंतिम टप्पा म्हणजे सुमारे दीडशे पायऱ्यांची चढण पूर्ण करत हे सर्व धावपटू समर्थ सेवा मंडळाच्या कार्यालयाच्या प्रांगणात आल्यावर या सर्व धावपटूंचा रामनामी प्रसाद तसेच पुष्पगुच्छ देऊन समर्थ भक्त योगेश व रामदासी यांच्या हस्ते सन्मान करून त्यांना प्रशस्तीपत्र, राम वस्त्र व सहभाग घेतल्याबद्दल अल्पोपहार देण्यात आला.
यावेळी उपस्थित धावपटूंना मार्गदर्शन करताना समर्थ भक्त योगेश व रामदासी म्हणाली की, श्री समर्थ रामदास स्वामींच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच नागरिकांना आरोग्यांचा मंत्र द्यावा यासाठी ही समर्थ सज्जनगड 2024 आयोजित करण्यात आली होती. अतिशय चढाचा हा धाव मार्ग अठरा वर्षावरील पुरुष व महिलांसाठी पाच किलोमीटर अंतराच्या टप्प्यात असला तरी धावपटूंचा यामध्ये खऱ्या अर्थाने उत्स्फूर्त सहभाग हेच या उपक्रमाचे यश आहे. निसर्गरम्य परिसरात धावपटूंना आनंद मिळाला तसेच त्यांच्यातील ऊर्जा समर्थ रामदास स्वामींनी खऱ्या अर्थाने अधिक वृद्धिंगत केली. नागरिकांचे आरोग्य सुदृढ व्हावे हाच या आयोजनाचा हेतू असून या स्पर्धेला आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल समर्थ सेवा मंडळ आपल्या सर्वांचे अभिनंदन करत आहे.
अशा प्रकारचा हा अनोखा उपक्रम श्री समर्थ सेवा मंडळांनी दरवर्षी चालू ठेवावा त्याला धावपटू निश्चितच मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करतील असे मत यावेळी अनेक मान्यवर धावपटूंनी व्यक्त केले. या समर्थ सज्जनगड 2024 मध्ये पुरुष धावपटू बरोबरच महिला तसेच छोट्या धावपटूचाही सहभाग विशेष दिसत होता.