ना. मकरंद पाटील यांच्या मुलासह 10 ते 15 जणांवर मारहाण, जबरी चोरीचा आरोप; ऍड. शाहिद इनामदार यांची पोलिसांत तक्रार

by Team Satara Today | published on : 11 September 2026


सातारा : शहर पोलीस ठाण्यात कॅबिनेट मंत्री मकरंद आबा पाटील यांचा मुलगा आहान पाटील याच्यासह 10 ते 15 जणांविरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवथर येथील रहिवासी असलेले वकील ऍड. शाहिद शहाबुद्दीन इनामदार यांनी 10 सप्टेंबर 2026 रोजी ही लेखी तक्रार नोंदवली आहे.
कृष्णानगर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कार्यालयात बोलावून घेऊन मला व माझे मित्र पंचायत समिती सदस्य राजेश मोहन पवार यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली, तसेच धमकावून मारहाण करण्यात आली आणि हातातील सोन्याची अंगठी काढून घेतली, असा आरोप तक्रारदाराने केला आहे.  
तक्रार अर्जातील माहितीनुसार, 5 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राजकीय सूडबुद्धीने आणि पक्षाच्या विरोधकांशी संबंध असल्याच्या संशयातून आहान पाटील याने आपल्या कार्यकर्त्यांना ‘वकिलाचे ऑपरेशन करा’ असे सांगून अंधारात नेऊन मारहाण करण्यास चिथावणी दिली. सुरज येवले, प्रशांत साळुंखे उर्फ पैलवान, रोहित शिंदे, नितीन शिंदे, संतोष येवले आणि इतर 8 ते 10 जणांनी लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. या मारहाणीदरम्यान प्रशांत साळुंखे याने 7 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून घेतली आणि जीवाची भीती घातली, असा दावा तक्रारदाराने अर्जात केला आहे.  
घटनेनंतर घाबरलेल्या अवस्थेत तक्रारदाराने सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. सुरुवातीला कुटुंबाची सुरक्षा आणि भीतीपोटी तक्रार दिली नव्हती, परंतु घटनेनंतरही सतत मिळणार्‍या धमक्यांमुळे जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे, असे ऍड. इनामदार यांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, 2023 च्या लागू तरतुदींनुसार तात्काळ एफआयआर नोंदवून कठोर कायदेशीर कारवाई करावी, घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित करावे आणि तक्रारदार व त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा पुरवावी, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
‘शिवसागर’ जलाशयात सांबर मादी चिमुकल्या अवखळ पिलासह लीलया पोहतानाचे दृश्य समोर; चित्रफीत समाज माध्यमांवर
पुढील बातमी
अवैधरित्या जनावरांच्या वाहतूक प्रकरणी शिंदेवाडी येथे ट्रकसह 8.45 लाखांचा मुद्देमाल जप्त

संबंधित बातम्या