सातारा : सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिका व एका नगरपंचायतीसाठी अर्ज भरण्याची प्रकिया आता गतिमान झाली आहे. रविवारी जिल्ह्यातून नगरसेवकपदांसाठी २९५ तर नगराध्यक्ष पदासाठी २५ अर्ज दाखल झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार उमेदवारांना दि. १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत. पहिल्या तीन दिवसांत जिल्ह्यातून नगरसेवक पदासाठी केवळ तीन अर्ज दाखल झाले होते. गुरुवारनंतर ही प्रक्रिया गतिमान झाली. रविवारी सातारा जिल्ह्यातून नगरसेवक पदासाठी तब्बल २९५ अर्ज दाखल झाले. यामध्ये कराड पालिकेसाठी सर्वाधिक ९५ तर सातारा पालिकेसाठी २४ अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी देखील रविवारी जिल्ह्यात २५ अर्ज दाखल झाले आहेत.
सातारा पालिकेची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे या पालिकेसाठी अद्याप राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला नाही. पालिकेच्या नगरसेवक पदासाठी सहा दिवसात केवळ ४८ अर्ज आले असून यामध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी आहे. तर सात जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करून निवडणुकीत शड्डू ठोकला आहे.