सातारा : येथील श्री पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शाहूनगरीत प्रथमच आयोजित केलेल्या सहस्त्रचंडी याग सोहळ्याला मोठ्या उत्साहात आणि हजारो देवी भक्तांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. आज शनिवारी सकाळी खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या सुविध्य पत्नी दमयंतीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत वेदमूर्ती ओंकार शास्त्री बोडस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधान संकल्प सोडून या सहस्त्रचंडी महायाग सोहळ्याला प्रारंभ झाला.
राजवाडा परिसरातील पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर परिसरात यानिमित्त भव्य मंडप उभारण्यात आला आहे .कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपीठापैकी भोसलेंच्या एक समजल्या जाणाऱ्या श्री महालक्ष्मी देवीचा प्रसन्न चेहरा असलेली सोन्याच्या रत्नजडित सिंहासनावरील सुरेख मूर्ती या मंडपात प्रमुख मुख्य देवता म्हणून स्थापन करण्यात आली आहे.आज विविध जाती ,धर्म आणि पंथातील १५१ देवी भक्तांनी सपत्नीक पुण्याहवाचनाचा कार्यक्रम संपन्न केला. यावेळी वेदमंत्रांच्या जयघोषात सुरू झालेल्या या सहस्त्रचंडी यागाचा प्रधान संकल्प खासदार उदयनराजे भोसले यांनी सोडल्यावर मंदिरातील दुर्गादेवीची विशेष पूजा संपन्न झाली.
मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने यावेळी या सोहळ्याचे प्रमुख यजमान धनंजय देशमुख आणि विनायक शास्त्री चिखलगे यांच्या हस्ते उदयनराजे भोसले व दमयंती राजे भोसले यांचा शाल, श्रीफळ, प्रसाद भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या सहस्त्रचंडी सोहळ्यात गणपती पूजन, पुण्याहवाचन ,नांदी श्राद्ध, आचार्य वरण ,प्रायश्चित्त होम ,गोपूजन ,स्थल शुद्धीसाठी उदकशांत ,मुख्य देवता स्थापना,नवग्रह स्थापना, नवग्रह होम सोहळ्यात धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर साडेअकरा वाजता वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांनी सहस्त्रचंडी महायाग व सप्तशती देवी स्तुती या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले.
सायंकाळी परगावाहून आलेल्या आणि यजमानपद भूषवलेल्या शेकडो यजमान आणि देवी अर्चना संपन्न केली. त्यानंतर सायंकाळी गंधतारा ढोल पथकाच्या वतीने मंदिर परिसरात ढोल वादन करून अभिवादन करण्यात आले तसेच सायंकाळी समर्थ सदन येथे समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री गुरुनाथ महाराज कोटणीस यांनी संत एकनाथ महाराजांच्या अभंगावर विस्तृत निरूपण केले. हे निरूपण प्रवचन पुढील दोन दिवस संपन्न होणार आहे.
संपूर्ण विश्वात शांतता निर्माण व्हावी
या सहस्त्रचंडी महायागाचा प्रधान संकल्प सादर करताना वेदमूर्ती ओंकार शास्त्री बोडस व दिलीप शास्त्री आफळे म्हणाले की, संपूर्ण विश्वात शांतता निर्माण व्हावी .हिंदू राष्ट्राची स्थापना व्हावी ,तसेच सध्या सुरू असलेले मंदिराचे सरकारीकरण थांबावे .देवीची ५१ शक्तीपीठे जी विविध राष्ट्रात आहेत ,ती सर्व हिंदूस्थान या भारत देशाच्या भूमीत यावीत .तसेच पंचपाळे हौद दुर्गा माता मंदिराच्या वतीने संभाजी महाराजांची सृष्टी उभारण्याच्या तसेच गोशाळेच्या स्थापनेचा संकल्प या द्वारे करण्यात आला आहे.
रविवार (दि.५) रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत सप्तशती पाठ वाचन व चंडी याग संपन्न होऊन दुपारी दोन ते पाच या वेळेत एक सहस्त्रकुमारीका पूजन म्हणजेच एक हजार बालकुमारींचे पूजन करण्यात येणार आहे. या सहस्त्रचंडी महायज्ञ यांच्या धार्मिक सोहळ्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचेसह विविध मान्यवरांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.