पालिकेच्या जागेवरील अतिक्रमणामुळे नागरिक संतप्त; सदरबझारातील रहिवाशांचा नगरपालिकेत ठिय्या; कारवाईची मागणी

by Team Satara Today | published on : 04 June 2026


सातारा : सदरबझार परिसरातील नगरपालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर वाढत चाललेल्या अतिक्रमणाच्या प्रश्नावरून स्थानिक नागरिकांनी गुरुवारी नगरपालिकेत धडक देत प्रशासनाचे लक्ष वेधले. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर ठोस निर्णय होत नसल्याने नागरिकांनी नगराध्यक्षांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करत आपला निषेध नोंदवला.

सर्वे क्रमांक 246 ते 248 परिसरातील रहिवाशांच्या मते, पालिकेच्या खुल्या जागेवर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून त्यामुळे परिसराच्या नियोजनबद्ध विकासावर परिणाम होत आहे. याबाबत अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी करूनही प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली.

देवराज कामाठी, महेश कामाठी, राजेंद्र भोसले, महेंद्र भोसले, मालन भोसले, रवींद्र कामाठी, सारिका भोसले यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. अतिक्रमणामुळे त्यांच्या घरांकडे जाणार्‍या मार्गावर अडथळे निर्माण झाले असून दैनंदिन वाहतूक व अन्य सोयी-सुविधांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाल्यानंतरही त्यांनी मूळ जागांवरील अतिक्रमण कायम ठेवले असून सार्वजनिक जागेवरही अतिक्रमण वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नगराध्यक्ष अमोल मोहिते हे शहराबाहेर असल्याने आंदोलकांनी मुख्याधिकारी विनोद जळक यांची भेट घेतली. यावेळी जळक यांनी संबंधित जागेची पाहणी व सर्वेक्षण करून वस्तुस्थितीची पडताळणी केली जाईल तसेच नियमांनुसार आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.

पालिकेची जागा अतिक्रमणमुक्त करून परिसराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली असून प्रशासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास पुढील काळात आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सराईत दुचाकी चोरटा जेरबंद ; चार गुन्ह्यांची उकल; सातारा तालुका पोलिसांची कारवाई
पुढील बातमी
साताराऔद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमधून महिला बेपत्ता

संबंधित बातम्या