मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसांची सुध्दा : कवी डॉ.अदिती काळमेख

by Team Satara Today | published on : 03 March 2025


सातारा : दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मला कविता म्हणण्याची संधी मिळाली, ही बाब मनाला फार सुखावणारी आणि जबाबदारीची जाणीव करून देणारी झाली. मराठी भाषा जगवण्याची, संवर्धनाची जबाबदारी फक्त साहित्यिकांचीच नाही तर प्रत्येक मराठी माणसांची सुध्दा आहे, असे मत कवी डॉ.अदिती काळमेख यांनी मांडले.

येथील नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहूपुरी आणि सातारा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा पंधरवडा दिनाच्या निमित्ताने अमळनेर ते दिल्ली आमची साहित्यवारी या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मसाप पुणे सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकीहाळ, लेखक प्रदीप कांबळे, अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष रवींद्र झुटिंग, किशोर बेडकीहाळ, मसाप, पुणे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित होते.

कवी डॉ. अतिथी काळमेख पुढे म्हणाल्या, ९८ वे साहित्य संमेलन दिल्लीत होणार असल्याने तसेच कवयित्री म्हणून मला जाण्याची संधी मिळाली. मराठा साम्राज्याची राजधानी सातारा येथून भारताची राजधानी दिल्ली येथे मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्याचा आनंद होताच.  दिल्लीत माय मराठीचा जयघोष सुरू आहे हे खूप छान होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण मराठी मनाला खूप सुखावणारे होते. साहित्य संमेलनात परिसंवाद कवी कट्टा, अधिकाऱ्यांचे मनोगत असे विविध कार्यक्रम खूप चांगल्या पध्दतीने झाले. लिहिणारे आणि वाचणारे या दोघांचीही रेलचेल या संमेलनात होती. संयोजनात थोड्याफार चुका झाल्या तरी त्या चुका पुढील साहित्य संमेलनात दुरुस्त करता आल्या तर साहित्य संमेलन आणखीनच चांगल्या पध्दतीने होईल. यावेळी त्यांनी विहीर भूल ही कविता सादर केली.

लेखक प्रदीप कांबळे म्हणाले, अमळनेर येथे ९७ वे साहित्य संमेलन झाले त्यात मी निमंत्रित कवी होतो. या साहित्य संमेलनात विविध भागातून कवी आले होते. त्यांच्या कविता ऐकून मी कवी म्हणून मला जो गर्व होता त्या गर्वाचे हरण या साहित्य संमेलनात झाले. माझ्या कवितेला उत्तम प्रतिसाद मिळाला. मला या साहित्य संमेलनातून खूप काही शिकता आले. प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकण्यासारखे असते आणि ते आपण शिकून घेतले पाहिजे. अमळनेर येथील साहित्य संमेलनात कविता सादर केल्याने मला मध्य प्रदेशात दोन वेळा व्याख्यान देण्याची संधी मिळाली. मध्य प्रदेशातील लोक मराठी भाषा ऐकण्यासाठी आसुसलेले आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रदीप कांबळे यांनीही माझ नेहमीचच ही कविता उपस्थित साहित्यप्रेमींना ऐकवली.

यावेळी रवींद्र बेडकीहाळ म्हणाले, मसाप, शाखा शाहूपुरी शाखा महाराष्ट्रात अग्रगण्य असे काम करत आहे. सातारा जिल्ह्याने अखिल भारतीय साहित्य संमेलनाला १७ अध्यक्ष दिले. महाराष्ट्रात अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला मात्र शाहूपुरी शाखेने साहित्य क्षेत्रात चांगले काम करून मराठी भाषेच्या दर्जा अगोदरच मिळवला आहे असे गौरवोद्गार काढले.

यावेळी रवींद्र झुटिंग म्हणाले,  मसाप शाखा शाहूपुरी च्या माध्यमातून साताऱ्यात वेगवेगळे साहित्यिक येतात. साहित्य परिषदेमुळे साताऱ्यात लेखक, कवी यांना व्यासपीठ मिळाले. प्रास्ताविक अजित साळुंखे, सूत्रसंचालन आर.डी. पाटील यांनी केले तर आभार विनोद कुलकर्णी यांनी मानले. याप्रसंगी मसाप शाखा शाहूपुरी कार्याध्यक्ष ॲड. चंद्रकांत बेबले, कोषाध्यक्ष सचिन सावंत, संजय माने, वजीर नदाफ, अमर बेंद्रे, उमेश करंबळेकर, सौ.ज्योती कुलकर्णी, सौ.अश्विनी जठार तसेच साहित्यप्रेमी व सातारकर उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कोट्यवधींचे चंदन जप्त
पुढील बातमी
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी 'हे' फळ आहे सर्वोत्तम

संबंधित बातम्या