रहिमतपूर : येथे दारूच्या व्यसनामुळे तोल जाऊन नदीपात्रात बुडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संतोष गणपत भोसले (वय ५०, रा. नांदवळ, ता. कोरेगाव) असे मृत व्यक्तीचे नाव असून, गावाजवळच्या कमंडलू नदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह आढळला. याप्रकरणी रहिमतपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संतोष भोसले यांची पत्नी दमयंती भोसले यांचा काही दिवसांपूर्वी सातारा येथे अपघात झाला होता. तिच्यावर उपचार सुरू होते. १४ ऑगस्ट रोजी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, तिची काळजी घेण्यास घरी कोणी नसल्याने, ती रहिमतपूर येथील माहेर गणपती काटे यांच्या घरी थांबली होती. संतोष भोसले हे देखील त्यांच्यासोबत येथे आले होते.
संतोष भोसले यांना दारूचे व्यसन होते. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते किरोली गावी भाचीकडे जाऊन येतो, असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नीलेश माने या व्यक्तीने रोहित माने यांना फोन करून संतोष भोसले हे नदीपात्रात पडल्याची माहिती दिली.
या घटनेची खात्री करण्यासाठी रोहित माने घटनास्थळी पोहोचले असता, मृतदेह त्यांचे काका संतोष भोसले यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. दारूच्या नशेत तोल गेल्याने ते नदीत पडले असावेत आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.