सातारा : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या कामांची अंतिम यादी येत्या 20 ऑक्टोबरपर्यंत घ्यावी. यादी मिळवून घेण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी यांनी संपर्क साधावा, 20 ऑक्टोबरपर्यंत आलेल्या कामांच्या यादीलाच तात्काळ मान्यता द्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम, आदिवासी घटक कार्यक्रम बाह्यक्षेत्र) सन 2025-26 अंतर्गत आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्ह नियोजन अधिकारी यशवंत थोरात यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींकडील कामाच्या अंतिम यादी मिळवून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही प्रयत्न करावेत, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमाप्रमाणे स्मार्ट अंगणवाडी उपक्रम जिल्ह्यात राबवावा. बोलक्या भिंती, लहान मुलांना बसण्यासाठी बेचेंस, स्वच्छता गृह यांची उभारणी करावी. यासाठी जिल्हा परिषदेला निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडणुका होणार आहेत. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू होईल यामुळे विविध विभागांनी तांत्रिक मान्यतेसह प्रशासकीय मान्यता तातडीने घेऊन नियोजनबद्ध कामे पूर्ण करावीत. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतील निधी परत जाणार नाही याचीही खबरदारी घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.