सातारा : मुंबईतील अनधिकृत मशीद पाडकामास पाठिंबा देणाऱ्या व्यावसायिकाला दिलेल्या धमकीचा तपास करताना महाबळेश्वरमधून एकाचे थेट पाकिस्तानशी आणि 'लष्कर-ए-तोयबा'शी धागेदोरे उघड झाले असून, मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर पथकाने त्याला अटक केली आहे.
मोहम्मद शफीक मोहम्मद अकबर लोन (वय ३९, रा. महाबळेश्वर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील अनधिकृत मशीद पाडकामाच्या कारवाईस प्रसिद्ध व्यावसायिक इम्तियाज खत्री यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर खत्री यांना आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून सातत्याने धमक्या येत असल्याने त्यांनी पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाच्या तांत्रिक तपासात या धमक्यांचे दूरध्वनी व संदेश महाबळेश्वर परिसरातून पाठवले जात असल्याचे समोर आले.
तपासादरम्यान संशयित शफीकचे वडील आणि दोन भाऊ सध्या पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथे वास्तव्यास असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचा एक भाऊ २०१९ मध्ये पाकिस्तानात गेला असून तो 'लष्कर-ए-तोयबा' या दहशतवादी संघटनेत कमांडर पदावर कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. चौकशीत शफीकने ‘फैयाज काश्मिरी’ नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीशी समाजमाध्यमांद्वारे सातत्याने संपर्क साधल्याचे आणि काही संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्याचेही उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाईल व एक डायरी जप्त केली असून, मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.
दरम्यान, महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शफीक याला अटक करण्यात आली असून, त्याचे पाकव्याप्त काश्मीरमधील ‘लष्कर-ए-तोयबा’शी थेट संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पुढील सखोल चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतल्याची माहिती वाई विभागाचे पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंखे यांनी दिली आहे.
मुंबईतील व्यावसायिकाला धमकावणाऱ्याचे ‘लष्कर-ए-तोयबा’शी कनेक्शन; महाबळेश्वरातून संशयितास अटक
by Team Satara Today | published on : 13 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा