सातारा : श्री गजानन महाराज (शेगांव) भक्त मंडळ, सातारा यांच्या वतीने प.पू. सद्गुरू श्री गजानन महाराजांचा १४८ वा प्रकटदिन उत्सव दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ ते ०८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. हा उत्सव अर्कशाळानगर, शाहुपुरी रोड, सातारा येथील श्रींच्या मंदिरात होणार आहे.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी गुरुवार दि ५ रोजी (संकष्टी चतुर्थी) रोजी सकाळी श्री गणेश मूर्तीवर पंचामृत महाअभिषेक, दुपारी व सायंकाळी महाआरती व नामस्मरण, सामुदायिक अथर्वशीर्ष पठण तसेच सायंकाळी श्री. विवेक घाटगे प्रस्तुत मराठी व हिंदी गीतांचा ‘गीत गंध’ कार्यक्रम पार पडला .
शुक्रवार दि. ०६/०२/२०२६ रोजी सकाळी श्रींची षोडोपचार महापूजा, दुपारी महाआरती, सायंकाळी माऊली भजनी मंडळ, करजे यांचा हरिपाठाचा कार्यक्रम व महाआरती संपन्न होणार आहे.
शनिवार दि. ०७/०२/२०२६ रोजी सकाळी शांतीपाठ, संकल्पपूर्वक धार्मिक विधी, विविध देवतांची स्थापना, महाअभिषेक, नवग्रह होम, सद्गुरू श्री गजानन महाराज प्रित्यर्थ हवन तसेच श्री दत्तमाला मंत्र हवन होणार आहे. रात्री ब्रह्मचैतन्य गायन सेवा मंडळ, सातारा यांचा मराठी भावगीते व भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मुख्य दिवस – रविवार दि. ०८/०२/२०२६ (माघ वद्य सप्तमी – प्रकटदिन) रोजी सकाळी भारतातील पवित्र नद्यांचे जल एकत्र करून पंचामृतासह श्रींच्या मूर्तीवर महाअभिषेक “गण गण गणात बोते” या सिद्ध मंत्राच्या नामघोषात करण्यात येणार आहे.
यानंतर शांतीपाठ, षोडशोपचार पूजा, मुख्यदेवता हवन, सिद्ध मंत्र हवन, मृत्युंजय होम, पूर्णाहुती, अभिषेक, सामुदायिक वाचन, नामस्मरण, महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री पुन्हा महाआरती व नामस्मरणाने उत्सवाची सांगता होणार आहे.
भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा तसेच भक्त मंडळास सहकार्य करावे, असे आवाहन भक्त मंडळाचे अध्यक्ष यांनी केले आहे.